Indian Cricketer Unseen Flashback Photo, Father's Day 2025: बाप हा शब्द कायम कणखर या भावनेशी जोडला गेलेला असतो. घरात मुलांचे पालन पोषण करणे ही जितकी आईची जबाबदारी असते, तितकीच वडिलांचीही जबाबदारी असते. वडील आणि मुलगा हे नातं खूप वेगळं असतं. मुलगा लहानाचा मोठा होत असताना, वडिल कधीही आपल्या भावना त्याच्या पुढ्यात व्यक्त करताना दिसत नाहीत. पण नंतर आपलेच जुने लहानपणीचे फोटो पाहताना मात्र, आपल्या वडिलांच्या डोळ्यातील भाव, हाताच्या स्पर्शातील प्रेम लख्खं दिसतं. फादर्स डे च्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी आपल्या वडिलांसोबतचे फोटो आज पोस्ट करत आहेत. अशाच एका जुन्या फोटोची सध्या चर्चा रंगली आहे. हा छोटासा मुलगा कोण आहे, हे तुम्हाला ओळखता येतंय का?
हा चिमुरडा म्हणजे भारतीय क्रिकेटचा मोठ्ठा स्टार
फादर्स डे, मदर्स डे किंवा आई-वडिलांचा वाढदिवस किंवा अगदी स्वत:चा वाढदिवस असताना बरेचदा सेलिब्रिटी मंडळी आपले जुने फोटो पोस्ट करतात. काहीवेळा ते आपले लहानपणीचे फोटोही पोस्ट करत असतात. अनेक सेलिब्रिटी आता जसे दिसतात, तसेच पूर्वीही दिसतात. त्यामुळे ओळखणे सोपे जाते. पण काहींचे चेहरे वयानुसार फारच बदलतात. त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण असते. या फोटोतील चेहराही थोडासा गोंधळात टाकणारा आहे. तर हा चिमुरडा आहे भारतीय क्रिकेटमधील मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ).
सचिनने फादर्स डे निमित्त एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या वडिलांच्या हातात खेळताना दिसतोय. हा फोटो पाहून बहुतेकांना तो सचिन असल्याचे ओळखू येतच नाही. पण काही 'जबरा फॅन' सचिनला ओळखतात. सचिनने या फोटोसोबत खूप छान संदेश लिहिला आहे. चाहत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटापूर्वी, शतकांपूर्वीही जगात एक माणूस होता, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला. त्याच्याकडे हात लेखणी असायची आणि चेहऱ्यावर स्मितहास्य असायचे. त्या व्यक्तीतील शांतता, दयाळूपणा आणि प्रेम हे गुण माझ्यात आहे आणि त्या भावनांची मी कायम जपणून करेन, फादर्स डेच्या शुभेच्छा. बाबा, तुमची आठवण येते! असे सचिनने यासह लिहिले आहे.