Join us  

Sachin Tendulkar Yuvraj Singh : सचिन तेंडुलकरला ते द्विशतक पूर्ण करायला द्यायला हवं होतं; द्रविडच्या निर्णयावर युवराज सिंगचं परखड मत

युवीने पुढील कसोटीत शतक झलकावले आणि तीन कसोटींच्या मालिकेत त्याने 57.50च्या सरासरीने 200+ धावा केल्या होत्या. पण, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळाले नाही. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26 शतकं आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 3:40 PM

Open in App

29 मार्च 2004 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत. वीरेंद्र सेहवाग हा कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला, परंतु वीरूच्या या अविश्वसनीय खेळीवर एका प्रसंगाने पाणी फिरवले. याच कसोटीत सचिन तेंडुलकर 194 धावांवर खेळत असताना कर्णधार राहुल द्रविड याने डाव घोषित केला. द्रविडच्या या निर्णयावरून त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला होता... त्याच्यावर टीकाही करण्यात आली. त्यात आता भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याने  उडी मारली आहे.

युवराज सिंगने Sports18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,''तेव्हा मी तेंडुलकरसोबत फलंदाजी करत होतो. सामना सुरू असताना आम्हाला मेसेज आला की तुम्ही जलद खेळा, आपण डाव घोषित करणार आहोत.'' अर्धशतक झळकावल्यानंतर युवराज सिंग बाद झाला आणि कर्णधार राहुल द्रविडने तेंडुलकर 194 धावांवर असताना डाव घोषित केला. ''तेंडुलकरने पुढील षटकात त्या सहा धावा केल्या असत्या आणि त्यानंतर आम्हाला 8-10 षटकं फेकायला मिळाली असती. त्यामुळे दोन षटकं अतिरिक्त खेळलो असतो तर फार फरक पडला नसता,''असे युवी म्हणाला.  

''जर तो कसोटीचा तिसरा किंवा चौथा दिवस असता, तर तुम्ही संघाला प्राधान्य द्यायलाच हवं आणि तेव्हा 150 धावांवर असतानाही डाव घोषित करायला हरकत नव्हती. माझ्या मतावर अनेकांचे वेगवेगळे मत असू शकते. पण, तेंडुलकरच्या 200 धावानंतर संघाने डाव घोषित करायला हवा होता,'' हे युवीने म्हटले.  युवीने पुढील कसोटीत शतक झलकावले आणि तीन कसोटींच्या मालिकेत त्याने 57.50च्या सरासरीने 200+ धावा केल्या होत्या. पण, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळाले नाही. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26 शतकं आहेत.   

टॅग्स :युवराज सिंगराहुल द्रविडसचिन तेंडुलकर
Open in App