कोलंबो : ‘भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता,’ असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी केला. श्रीलंकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या त्यांनी दाव्यानंतर चर्चेला उधाण आले.
माजी खेळाडू माहेला जयवर्धने आणि तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा यांनी आरोप फेटाळून लावले. सामन्यात शेवटच्या क्षणाला संघात मुद्दाम बदल करण्यात आले, असाही दावा माजी क्रीडामंत्र्यांनी केला होता. आता माजी कर्णधार आणि तत्कालीन मुख्य निवडकर्ते अरविंदा डिसिल्वा यांनी या प्रकरणी मत मांडले.
‘काही लोक खळबळजनक दावा करतात आणि खोटे बोलतात. पण त्यांचा खोटेपणा उघड पाडण्यासाठी आयसीसी, बीसीसीआय आणि क्रिकेट श्रीलंकेने हा सामना फिक्स होता का? याचा तपास करावा. सचिन तेंडुलकरसारखा महान फलंदाज आपल्या समृद्ध कारकिर्दीत एक विश्वचषक जिंकला. त्याच विजेतेपदावर अशा प्रकारे प्रश्न उपस्थित केल्याने त्याच्या प्रतिमेलादेखील तडा जाऊ शकतो. त्यामुळे किमान सचिन आणि त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी तरी भारत सरकार आणि बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करावी आणि तपासाला सुरुवात करावी, म्हणजे सत्य समोर येईल आणि खेळाला गालबोट लागणार नाही,’ असे डिसिल्वा म्हणाले. (वृत्तसंस्था)
>काय म्हणाले होते अलुथगामगे
२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी कोणाचेही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही, पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा जो संघ खेळला तो मुळात आम्ही निवडलेला संघच नव्हता. शेवटच्या क्षणाला क्रीडामंत्री या नात्याने मी किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांंशी चर्चा न करता चार नवीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले होते. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनादेखील या प्रकरणी अंधारात ठेवण्यात आले,’ असा आरोप अलुथगामगे यांनी केला.