2000 चे दशक हे भारतीय क्रिकेटमधील अत्यंत मजेशीर दशक होते... या कालावधीत छोट्याशा शहरांमधील खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये आपली जागा बनवताना दिसले. महेंद्रसिंग धोनी हे त्यातले प्रमुख उदाहरण म्हणता येईल. एक असाच खेळाडू, ज्याच्या घरात क्रिकेटची पार्श्वभूमी नव्हती, परंतु त्याने भारतीय संघात स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या मीरत येथील प्रवीण कुमार ( Praveen Kumar) याने स्वींग गोलंदाजीच्या जोरावर २००७ ते २०१२ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने ६ कसोटी, ६८ वन डे व १० ट्वेंटी-२० सामने खेळले.
प्रवीण कुमार हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडूनही खेळला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार काळ मैदान गाजवता आले नाही. मैदानाबाहेरील त्याच्या तापट स्वभावाने त्याच्या कारकीर्दित अडथळा आणला. काही वृत्तानुसार प्रवीण प्रचंड दारू प्यायचा, पण आता त्याने धक्कादायक दावा केला आहे. तो म्हणाला,''जेव्हा मी भारतीय संघात होतो, तेव्हा सीनियर्स मला सांगायचे, ड्रिंक्स करू नको, हे करू नको, ते करू नको. तेच मला सांगायचे की ड्रिंक्स तर सर्वच करतात. तेच तर, नाव फक्त माझं बदनाम झालं.''
जेव्हा त्याला विचारले गेले की सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यांनी तुला तो सल्ला दिला होता का? यावर तो म्हणाला, नाही. कॅमेरासमोर नाव घ्यायचं नाही. ती व्यक्ती कोण हे सर्वांना माहित आहे. जे मला वैयक्तिकरित्या ओळखतात, त्यांना माहित्येय मी कसा आहे ते. माझी वाईट प्रतिमा तयार केली गेली आहे.