मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकर याच्या काल झालेल्या साखरपुड्याच्या वृत्ताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अर्जुन तेंडुलकर आणि त्याची मैत्रिण सानिया चंकोड यांचा काल अगदी गोपनीय पद्धतीने साखरपुडा पार पडला. त्याबरोबरच कालपर्यंत फारशी चर्चेत नसलेली सानिया चंडोक ही तरुणी प्रकाशझोतात आली आहे. लोक तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
सानिया चंडोकबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिने मुंबईत एका यशस्वी व्यवसायाची सुरुवात केली आहे. ती मिस्टर पॉजची संस्थापक आहे. हे एक प्रीमियम पेट सलून आणि स्पा आहे. येथे कुत्रे, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांसाठी आलिशान सुविधा उपलब्ध आहेत. इथे जनावरांचं हेअर कटिंग आणि स्पा याशिवाय शाम्पू, औषधे, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, खाण्यापिण्याच्या वस्तू, खेळणी आणि कपडेही मिळतात.
मिस्टर पॉज मध्य कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी आणि धुण्यासाठीची फी ही त्यांचा आकार आणि ब्रीडवर अवलंबून असते. म्हणजेच छोटे केस असलेल्या कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी सरासरी १४०० ते १५०० रुपये एवढी रक्कम आकारली जाते. तर मध्यम आकाराच्या कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठीची फी १५०० ते २००० रुपये एवढी आहे. तर मोठ्या कुत्र्यांसाठी २५०० ते ४००० रुपये एवढा खर्च येतो. याशिवाय गोल्ड आणि प्लॅटिनम मेम्बरशिपसुद्धा उपलब्ध आहे.
मुंबईमध्ये मिस्टर पॉज सलूनच्या दोन शाखा आहेत. त्यातील पहिली वरळी येथील हनुमान लेन पार्कमधील न्यू लोढा वर्ल्ड टॉवरमधील श्री लक्ष्मी सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरवर आहे. ते मंगळवार ते रविवार या काळात उघडे असते. तिथे १० वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या लाडके कुत्रे आणि मांजरांची ग्रुमिंग करू शकता. तर दुसरी शाखा ह्युजेस रोड येथे आहे.