Join us  

SA vs PAK: आफ्रिकेच्या डेल स्टेनला दिग्गज कपिल देव यांचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी

दुखापतीतून सावरत कमबॅक करणारा दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन चांगल्या फॉर्मात दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 12:32 PM

Open in App

जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : दुखापतीतून सावरत कमबॅक करणारा दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा अंदाज बांधणे अवघड जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा विक्रम नावावर केला. त्याने शॉन पोलॉकचा 421 विकेटचा विक्रम मोडला. जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याला आणखी एक विक्रम खुणावत आहे. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गद गोलंदाज यांचा कसोटी क्रिकेटमधील विकेट्सचा विक्रम मोडण्याची स्टेनला संधी आहे.

सध्या स्टेनच्या नावावर 91 सामन्यांत 433 विकेट्स आहेत आणि त्याला कपिल देव ( 434) यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आहे. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. आफ्रिकेच्या 381 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे 3 फलंदाज 153 धावांवर माघारी परतले आहेत. त्यांना विजयासाठी 228 धावांची गरज आहे.

पाकिस्तानच्या शान मसूदची विकेट घेताच स्टेनने इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड व श्रीलंकेचा रंगना हेराथ यांच्या 433 विकेटच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा पल्ला गाठण्यासाठी ब्रॉड 124 सामने, तर हेराथ 93 सामने खेळला आहे. त्यांच्या तुलनेत स्टेनने 91 सामन्यांत 433 विकेट घेण्याचा पराक्रम केला. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्टेनने 5 डावांत आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे.  

टॅग्स :कपिल देवद. आफ्रिकापाकिस्तान