केपटाऊन : ‘गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतार पाहण्यास मिळाले. बोर्डमध्ये अनेक बदल झाले. त्यामुळे मायदेशात होणारी भारताविरुद्धची मालिका दक्षिण आफ्रिका क्रिकेटला योग्य दिशा देईल,’ असे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याने सांगितले. २६ डिसेंबरपासून भारताविरुद्ध रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी एनगिडीची आफ्रिका संघात निवड झाली आहे.
एनगिडीने म्हटले की, अशा प्रकारचा महत्त्वाचा दौरा अनेक गोष्टी योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतो. सध्या आम्ही ज्या प्रक्रियेनुसार वाटचाल करत आहोत, त्याने आम्ही जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत आव्हान निर्माण करू शकतो. आम्ही पुनर्वसनाच्या बाबतीत चर्चा करत होतो, पण ही वेळ एकजूट होण्याची आहे.
दक्षिण आफ्रिकेकडे ताकदवान वेगवान मारा आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कडवी चुरस रंगेल, असे मत एनगिडीने व्यक्त केले. तो म्हणाला की, दोन्ही संघांमध्ये खूप चांगली प्रतिस्पर्धा आहे आणि मी यासाठी उत्सुक आहे. यामुळे खेळाडूंना शानदार कामगिरीसाठी प्रेरणा मिळते. सध्याच्या वेळेला कोणताही संघ आपली जागा निश्चित मानत नसणार, याची खात्री आहे. बायो-बबलमध्ये राहणे खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरत असून यामुळे काही खेळाडू मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतात. याबाबत एनगिडी म्हणाला की, बायो-बबलमुळे जे कोणी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतात त्यांचा मी सन्मान करतो. कारण त्यांना या प्रसंगाशी मानसिकरीत्या लढता येणार नसल्याची कल्पना असते. काही वेळा मी स्वत: असा अनुभव घेतला, पण त्यावेळी मी घरी परतण्याचा निर्णय घेतला नाही. असे असले, तरी नक्कीच याचा तुमच्या मनावर परिणाम होतो. दडपण कमी करण्याचे आपण अनेक मार्ग शोधतो.