Join us  

India Tour of South Africa : कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं टीम इंडियाची वाढवली चिंता; BCCIची वेट अँड वॉचची भूमिका 

India Tour of South Africa : कोरोना व्हायरस आता संपतोय असे वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिअंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 5:32 PM

Open in App

India Tour of South Africa : कोरोना व्हायरस आता संपतोय असे वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिअंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या-जाणाऱ्या विमान वाहतुकीला बंदी घातली आहे. त्यात टीम इंडियाचेही आता टेंशन वाढले आहे. न्यूझीलंड मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे, परंतु आता या नव्या व्हेरिअंटमुळे हा दौरा संकटात सापडला आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन कसोटी, तीन वन डे व चार ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा अ संघ आधीच दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे आणि तेथे तीन unofficial कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवातही झाली आहे.  

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला B.1.1.529 या व्हेरिअंटनं वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. या व्हेरिअंटनं  शेजारील देशांमध्येही हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत नव्या व्हेरिअंटचे १००हून अधिक रुग्ण सापडले आहेत. भारतीय संघ या दौऱ्यात खेळणाऱ्या जोहान्सबर्ग व प्रेटोरिया येथेही या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण सापडल्यानं बीसीसीआयची चिंता वाढली आहे. पण, बीसीसीआयनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ८ डिसेंबरला भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणे अपेक्षित आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''आम्हाला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून तेथील परिस्थितीबाबत माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमची भूमिका सांगू शकत नाही. नियोजित वेळापत्रकानुसार भारतीय संघ ८ किंवा ९ डिसेंबरला मुंबईहून आफ्रिकेसाठी रवाना होणे अपेक्षित आहे.'' 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल, त्यानंतर २६ डिसेंबरला दुसरी कसोटी सेंच्युरीयन व ३ जानेवारी २०२२ला तिसरी कसोटी केप टाऊन येथे होईल.  त्यानंतर  तीन वन डे व चार ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाद. आफ्रिकाबीसीसीआय
Open in App