Sreesanth's Wife Slams Lalit Modi And Michael Clark : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २००८ च्या पहिल्या हंगामात हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील वादाचे प्रकरण चांगलेच गाजले. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्स) यांच्यातील सामन्यात दोन भारतीय खेळाडूंमध्ये चांगलाच राडा झाला होता. त्यावेळी MI कडून खेळणाऱ्या फिरकीपटू हरभजन सिंगनं रागाच्या भरात श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. १७ वर्षांनी मैदानातील तो वाद पुन्हा चर्चेत आलाय. कारण IPL चे संस्थापक आणि तत्कालीन अध्यक्ष ललित मोदी याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकेल क्लार्कच्या खास शोमध्ये त्या घटनेचा व्हिडिओ जगजाहीर केलाय. हा प्रकार पाहून श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी चांगलीच संतापली आहे. तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून राग व्यक्त करताना ललित मोदीसह क्लार्कची लाजच काढलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीसंतच्या बायकोची संतप्त प्रतिक्रिया
श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी हिने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून पतीच्या भांडणाचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या ललित मोदीसह मायकेल क्लार्कची शाळा घेतली. तुम्हाला लाज वाटायला हवी. माणुसकीचं भान विसरून लोकप्रियतेसाठी तुम्ही २००८ च्या प्रकरण उकरुन काढलं आहे. श्रीसंत आणि हरभजन दोघेही हा वाद विसरुन पुढे गेले आहेत. दोघांची मुले आता शाळेत जातात. याच भान तुम्ही ठेवायला हवे होते. व्हिडिओ शेअर करून जुन्या गोष्टी दाखवण्याता प्रकार अत्यंत घृणास्पद, निर्दयी आणि अमानवीय आहे. अशा शब्दांत भुवनेश्वरीनं ललित मोदी आणि मायकेल क्लार्क यांची शाळा घेतलीये.
जुन्या गोष्टी उकरून काढत कुटुंबियाला नाहक त्रास
मोठया आव्हानांचा सामना करुन श्रीसंत आयुष्यात स्थिरावलाय. पत्नी आणि एका आईच्या भूमिकेत १८ वर्षांपूर्वीच्या घटनेचा व्हिडिओ पाहणं त्रासदायक वाटते. ज्या धक्क्यातून सावरलो, त्या गोष्टीची आठवण करून पुन्हा आमच्या कुटुंबियाला नाहक त्रास देण्याचा प्रकार घडलाय, असेही भुवनेश्वरी म्हणाली आहे.
...अन् ललित मोदीनं तो व्हिडिओच केला जगजाहिर
ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटर मायकेल क्लार्क याच्या पॉडकास्ट शोमध्ये ललित मोदीनं हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यात झालेल्या वादाचा फक्त किस्सा सांगितला नाही तर आतापर्यंत जो व्हिडिओ समोरच आला नव्हता तो व्हिडिओच शेअर करून टाकला. सामना संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झाले होते. पण माजा सुरक्षा कॅमेरा चालू होता, असे सांगत ललित मोदीनं भांडणाचा व्हिडिओ सार्वजनिक केल्याचे पाहायला मिळाले.