Join us

श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव

काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:19 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज श्रीसंत याच्या IPL दरम्यानच्या दुखापतीच्या प्रकरणात राजस्थान रॉयल्सला नुकसान भरपाईच्या रुपात ८२ लाख रुपये द्यावे, असे आदेश राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) दिले होते. पण या प्रकरणात आता नवे ट्विस्ट आले आहे. संबंधित विमा कंपनीनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर 

काय आहे नेमकं प्रकरण?

एस श्रीसंत हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळला आहे. २०१२ च्या हंगामात तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. पण २८ मार्चला जयपूर येथील मैदानात नेट प्रॅक्टिस वेळी घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे  त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती.   IPL दरम्यान खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघाने २०१२ च्या हंगामासाठी ‘खेळाडू शुल्क भरपाई' अतर्गंत ८.७० कोटी रुपयांची पॉलिसी घेतली होती.  श्रीसंतनं दुखापतीमुळे माघार घेतल्यावर या पॉलिसीअंतर्गत राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं १७ सप्टेंबर २०१२ रोजी नुकसान भरपाईच्या रुपात विमा कंपनीकडे ८२. ८० लाख रुपयांचा दावा ठोकला होता. 

NCDRC ने राजस्थानच्या बाजूनं दिला निर्णय

एस. श्रीसंतला झालेल्आ दुखापतीच्या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने राजस्थान रॉयल्सकडून निर्णय देताना या प्रकरणात विमान कंपनीने ८२ लाख रुपये नुकसान भरपाईच्या रुपात द्यावे, असे आदेश दिले. पण  युनायटेड इन्शुरन्स कंपनी आता या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

विमा कंपनीनं काय केलाय दावा?

विमा कंपनीने दावा केलाय की, संबंधित पॉलिसी उतरण्याआधीच श्रीसंतच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. RR फ्रँचायझी संघाने यासंदर्भात कोणतीही माहिती विमा कंपनीला दिली नव्हती. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने याप्रकरणात निर्णय देताना आधीपासून असलेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले आहे, असा दावा विमा कंपनीकडून करण्यात आलाय.

 कुणाच्या बाजूनं लागणार निकाल?

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणात अतिरिक्त दस्तावेज सादर करण्यासाठी सुनावणी पुढे ढकलली आहे. यात  विमा अर्जासह श्रीसंतच्या फिटनेस प्रमाणपत्राचाही समावेश आहे. राजस्थान रॉयल्सच्या वकिलांकडून संबंधित प्रकरणात श्रीसंतचे फिटनेस प्रमाणपत्र विमा कंपनीला दिल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :राजस्थान रॉयल्सआयपीएल २०२४श्रीसंतऑफ द फिल्ड