Join us  

एस श्रीसंतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; क्रिकेट अकादमी उघडण्याच्या नावाखाली घेतले १८.७ लाख रुपये 

केरळ पोलिसांनी गुरुवारी माजी भारतीय क्रिकेटपटू एस श्रीसंत आणि इतर दोघांविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 4:08 PM

Open in App

केरळ पोलिसांनी गुरुवारी माजी भारतीय क्रिकेटपटू एस श्रीसंत आणि इतर दोघांविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. केरळमधील चुंडा येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने आरोप केला आहे की, राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी २५ एप्रिल २०१९ पासून वेगवेगळ्या तारखांना त्याच्याकडून एकूण १८.७० लाख रुपये घेतले. या लोकांनी कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बांधणार असल्याचा दावा केला होता. राजीव आणि व्यंकटेश यांच्या कंपनीत श्रीसंतची भागीदारी आहे.

तक्रारदार सरिश गोपालने सांगितले की, त्याला आमिष दाखवून आणि अकादमीमध्ये भागीदार बनण्याची संधी देण्यात येईल असे सांगून गुंतवणूक करायला लावली. श्रीसंत आणि त्याच्या इतर दोन साथीदारांवर आयपीसीच्या कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७ आणि वन डे वर्ल्ड कप २०११ च्या विजेत्या भारतीय संघाचा श्रीसंत सदस्य होता. त्याने भारताकडून २७ कसोटी, ५३ वन डे आणि १० ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. श्रीसंतच्या नावावर आयपीएलच्या ४४ सामन्यांत ४० विकेट आहेत. मे २०१३ मध्ये दिल्ली पोलिसांनी श्रीसंत आणि राजस्थान रॉयल्सचे दोन सहकारी खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर बीसीसीआयने तिन्ही खेळाडूंवर बंदी घातली. मात्र, श्रीसंतने या आरोपांविरुद्ध दीर्घ लढा दिला आणि २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

२०१८ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्यावर लादलेली आजीवन बंदी समाप्त केली होती. परंतु २०१९ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली परंतु बीसीसीआयला त्याची शिक्षा कमी करण्यास सांगितले. नंतर बोर्डाने त्याच्यावर लादलेली आजीवन बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली जी सप्टेंबर २०२० मध्ये संपली. 

टॅग्स :श्रीसंतगुन्हेगारी