Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजांचा कर्दनकाळ वेस्ट इंडिज संघात परतला, इंग्लंडच्या चमूत धाकधूक

2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेला तो इंग्लंडची धुलाई करण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 20:04 IST

Open in App

सेंट जॉर्ज,स ग्रेनाडा : वन डे कारकिर्दीत 91 चौकार व 54 षटकारांची आतषबाजी करणारा आंद्रे रसेल वेस्ट इंडिज संघात परतला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेल्या रसेलला वेस्ट इंडिजनेइंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. जुलै 2018 नंतर म्हणजेच जवळपास 7 महिन्यानंतर रसेल विंडीज संघाकडून वन डेत पुनरागमन करणार आहे. 

दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी रसेलला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रसेल हा संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावेल असा विश्वास निवड समिती प्रमुख कर्टनी ब्राऊन यांनी व्यक्त केला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता रसेलचे संघात परतणे हे विंडीज संघासाठी शुभसंकेत मानले जात आहे. ''दुखापतीमुळे केमार रोचने उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे आणि त्याच्या जागी शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात रसेलचा समावेश करण्यात आला आहे. रसेलच्या पुनरागमनाने आमचा संघ आणखी मजबूत होणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रसेलला जास्त षटक टाकता येणार नाहीत, याची आम्हाला कल्पना आहे. पण, त्याच्या फलंदाजीचा तोफखाना आमच्यासाठी महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे,'' असे ब्राऊन यांनी सांगितले.

रसेल सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान संघाकडून खेळत आहे. चौथा व पाचवा वन डे सामना अनुक्रमे 27 फेब्रुवारी आणि 2 मार्चला खेळवण्यात येणार आहे. 30 वर्षीय रसेलने 52 वन डे सामने खेळले आहेत आणि त्याच्या गाठीशी 2011 व 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचा अनुभव आहे. त्याच्या नावावर 998 धावा असून 68 विकेट्सही आहेत. 2011 मध्ये भारताविरुद्ध केलेल्या 92 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे, तर भारताविरुद्धच जमैका येथे त्याने 35 धावांत 4 विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. वेस्ट इंडिज आणि इंग्लड यांच्यातील पाच वन डे सामन्याची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना आज केनसिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.  

टॅग्स :वेस्ट इंडिजइंग्लंड