Join us  

RRvKXIP, IPL 2018 LIVE : राहुलच्या 95 धावांनंतही पंजाब राजस्थानकडून पराभूत

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने अॉरेंज कॅप पटकावली, नाबाद 95 धावांची खेळीही साकारली, पण किंग्ज इलेव्हन पंजाबला मात्र त्याला विजय मिळवून देता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 7:51 PM

Open in App
ठळक मुद्देया विजयासह राजस्थानने गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.

राहुलच्या 95 धावांनंतही पंजाब राजस्थानकडून पराभूत

जयपूर : एखादा खेळाडू जेव्हा मोठी खेळी साकारतो तेव्हा त्याचा संघ बहुतेक वेळा विजय मिळवतो. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने अॉरेंज कॅप पटकावली, नाबाद 95 धावांची खेळीही साकारली, पण किंग्ज इलेव्हन पंजाबला मात्र त्याला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर 158 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून राहुलने 70 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 95 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. राजस्थानच्या संघाने अचूक मारा करत पंजाबवर 15 धावांनी विजय मिळवला. 

आक्रमक सलामीवीर जोस बटलरच्या (८२) तुफानी फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शानदार विजय मिळवला.  यासह राजस्थानने ८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत तळाच्या स्थानावरुन सहाव्या स्थानी झेप घेतली. त्याचवेळी पंजाबचे तिसरे स्थान कायम राहिले आहे.सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी आक्रमक सलामीवीर जोस बटलरच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ८ बाद १५८ धावांची समाधानकारक मजल मारली. गेल्या काही सामन्यांतील पंजाबच्या फलंदाजांची धडाकेबाज कामगिरी पाहता त्यांच्यासाठी हे आव्हान कठीण नव्हते. मात्र, लोकेश राहुलचा अपवाद वगळता एकही फलंदाज टिकू शकला नाही. राहुलने ७० चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ९५ धावांची खेळी केली. त्याने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली खरी, पण त्याची झुंज अपयशी ठरली. पंजाबची मुख्य मदार धडाकेबाज ख्रिस गेलवर होती. मात्र, क्रिष्णप्पा गौथमच्या वाइड चेंडूवर चकल्याने गेल यष्टीचीत झाला. यानंतर एका चेंडूच्या अंतराने कर्णधार रविचंद्रन आश्विनला गौथमने त्रिफळाचीत केले. येथेच पंजाबचा संघ बॅकफूटवर गेला आणि अखेरपर्यंत पुनरागमन करु शकला नाही. यानंतर इतर फलंदाज चाचपडताना दिसले. परंतु, एकट्या राहुलने अखेरपर्यंत संघासाठी प्रयत्न करताना नाबाद अर्धशतकी तडाखा दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे आठव्या क्रमांकावरील अष्टपैलू मार्क स्टोइनिसने (११) राहुलशिवाय दुहेरी धावसंख्या गाठली. गौथमने ३ षटकात १२ धावा देत घेतलेले २ बळी निर्णायक ठरले.तत्पूर्वी, आक्रमक जोस बटलरने ५८ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ८२ धावांचा तडाखा देत राजस्थानला समाधानकारक मजल मारुन दिली. त्याच्याशिवाय संजू सॅमसनने १८ चेंडूत २२ धावांची आक्रमक खेळी केली. पुन्हा एकदा कर्णधार अजिंक्य रहाणे अपयशी ठरल्याने त्याच्या क्षमतेवर शंका निर्माण झाली. रहाणे १० चेंडूत केवळ ९ धावा करुन बाद झाला. अँड्रयू टाय याने रहाणेला बाद केल्यानंतर राजस्थानचा एकही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. परंतु, बटलरने कोणतेही दडपण न घेता एका बाजूने खंबीरपणे उभे राहत एकहाती संघाला सावरले. संजू सॅमसनने बटलरला यावेळी चांगली साथ दिली. या दोघांनी तिसºया गड्यासाठी ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अँड्रयू टाय (४/३४), मुजीब उर रहमान (२/२१) यांनी राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले. (वृत्तसंस्था)

कर्णधार व हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन पुन्हा अपेक्षित गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला. यंदा त्याने कल्पक नेतृत्वाने सर्वांचे लक्ष वेधले असले, तरी गोलंदाजीत निराशाच केली. या सामन्यात त्याने ४ षटकात ३४ धावा दिल्या, मात्र बळी मिळवण्यात अपयशी ठरला.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स : २० षटकात ८ बाद १५८ धावा (जोस बटलर ८२, संजू सॅमसन २२, बेन स्टोक्स १४, स्टुअर्ट बिन्नी ११; अँड्रयू टाय ४/३४, मुजीब उर रहमान २/२१, मार्कस स्टोइनिस १/१५.) वि.वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ७ बाद १४३ धावा (लोकेश राहुल ९५, मार्क स्टोइनिस ११, अक्षर पटेल ९, अक्षदीप नाथ ९, करुण नायर ३, ख्रिस गेल १; क्रिष्णप्पा गौथम २/१२, बेन स्टोक्स १/१३, इश सोढी १/१४, जोफ्रा आर्चेर १/३२, जयदेव उनाडकट १/३६.) 

11.30 PM : राजस्थानचा पंजाबवर 15 धावांनी विजय

11.19 PM : पंजाबला विजयासाठी 12 चेंडूंत 48 धावांची गरज

11.06 PM : पंजाब 15 षटकांत 6 बाद 92

10.57 PM : लोकेश राहुलचे 48 चेंडूंत अर्धशतक

- एकाबाजूने फलंदाज बाद होत असताना राहुलने पंजाबचा धावफलक हलता ठेवला. राहुलने 48 चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. राजस्थानविरुद्धचे त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले.

10.52 PM : अक्षर पटेल बाद; पंजाबला सहावा धक्का

 - धावचीत होत अक्षर पटेलने आत्मघात केला. अक्षरने पाच चेंडूंत 9 धावा केल्या.

10.38 PM : मनोज तिवारी बाद; पंजाबला पाचवा धक्का

- बेन स्टोक्सने अजिंक्य रहाणेकरवी मनोज तिवारीला झेलबाद केले. मनोजने 7 धावा केल्या.

10.27 PM : पंजाबला चौथा धक्का; अक्षदीप नाथ बाद

- फिरकीपटू इश सोधीने अक्षदीप नाथला बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला. नाथने 9 धावा केल्या.

10.18 PM : पंजाब पाच षटकांत 3 बाद 25

10.07 PM : पंजाबला तिसरा धक्का; करुण नायर बाद

- राजस्थानचा वेगवान गोलंदाज जेफ्रो आर्चरने करुण नायरला बाद करत पंजाबला तिसरा धक्का दिला. करुणला पाच चेंडूंत तीन धावा करता आल्या.

10.00 PM : पंजाबला दुसरा धक्का; आर. अश्विन बाद

- पंजाबचा कर्णधार आर. अश्विन तिसऱ्या स्थानी फलंदाजीला आला होता. पण कृष्णप्पा गौतमने तिसऱ्या षटकातच त्याला शून्यावर बाद केले.

9.58 PM : गेल OUT; पंजाबला मोठा धक्का

- कृष्णप्पा गौतमने तिसऱ्याच षटकात ख्रिस गेलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. गेलला फक्त एकच धाव करता आली.

 पंजाबने राजस्थानला 158 धावांत रोखले; अॅण्ड्र्यू टायचे चार बळी

जयपूर : झोकात सुरुवात करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला 158 धावांमध्ये रोखण्यात अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबला यश मिळाले. राजस्थानने आक्रमक सुरुवात करत पहिल्या पाच षटकात अर्धशतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर जोस बटलरचा अपवाद वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. बटलरने 58 चेंडूंत 9 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पंजाबकडून टायने भेदक मारा करत राजस्थानचा चार फलंदजांना माघारी धाडले.

9.34 PM : राजस्थानचे पंजाबपुढे 159 धावांचे आव्हान

9.33 PM : जोफ्रा आर्चर बाद; राजस्थानला सातवा धक्का

9.32 PM : राजस्थानला सहावा धक्का; बेन स्टोक्स बाद

9.22 PM : राजस्थानला पाचवा धक्का; स्टुअर्ट बिन्नी धावचीत

- अठराव्या षटकात धावचीत होत स्टुअर्ट बिन्नीने आत्मघात केला. बिन्नीने सात चेंडूंत 11 धावा केल्या.

9.13 PM : राजस्थानला मोठा धक्का; अर्धशतकवीर बटलर बाद

- पंजाबचा युवा फिरकीपटू मुजीबने जोस बटलरला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. बटलरने 58 चेंडूंत 9 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

9.06 PM : राजस्थानला तिसरा धक्का; संजू सॅमसन बाद

- पंजाबचा युवा फिरकीपटू फिरकीपटू मुजीब उर रेहमानने संजू सॅमसनला बाद केले. राजस्थानसाठी हा तिसरा धक्का होता. सॅमसनने 18 चेंडूंत 22 धावा केल्या.

8.56 PM : राजस्थानचे तेराव्या षटकात शतक पूर्ण

8.47 PM :  राजस्थान दहा षटकांत 2 बाद 82

- राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने धावफलक हलता ठेवण्याचे काम चोख बजावले. त्यामुळेच राजस्थानला 10 षटकांत 82 धावांपर्यंत मजल मारता आली.

8.40 PM : राजस्थानच्या जोस बटलरचे 27 चेंडूंत अर्धशतक

- राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने दमदार सुरुवात करत 27 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकामध्ये त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला होता.

8.33 PM : राजस्थानला दुसका धक्का; गौतम बाद

- मार्कस स्टॉइनिसने कृष्णप्पा गौतमला बाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला. गौतमला एका षटकाराच्या मदतीने आठ धावा करता आल्या.

8.24 PM : गौतमच्या षटकाराने राजस्थानचे पाचव्या षटकात अर्धशतक पूर्ण

- कृष्णप्पा गौतमने पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

8.16 PM : अजिंक्य रहाणे बाद ; राजस्थानला पहिला धक्का

- अॅण्ड्र्यू टायने अजिंक्य रहाणेलाा बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. अजिंक्यने एका चौकाराच्या जोरावर 9 धावा केल्या.

8.06 PM : जोस बटलरचा राजस्थानसाठी पहिला षटकार

- पहिल्या षटकात दोन चौकार लगावत राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने संघाला झोकात सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार लगावत बटलरने आपले इरादे स्पष्ट केले. राजस्थानसाठी हा पहिला षटकार होता.

आर. अश्विन सामन्यापूर्वी फ्रीजमध्ये बसून शांत होतो तेव्हा... पाहा हा फोटो

 

7.30 PM : राजस्थानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

 

आव्हान कायम राखण्यासाठी राजस्थानला पंजाबवर विजय आवश्यक

जयपूर : सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ तळाला आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यांना आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. पंजाबवर विजयासह राजस्थानला सहावे स्थान पटकावता येईल. दुसरीकडे पंजाबचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानविरुद्धचा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेने पंजाब ठोस पाऊल टाकू शकते.

 

दोन्ही संघ

 

 

दोन्ही संघांचे मैदानात आगमन

 

टॅग्स :आयपीएल 2018राजस्थान रॉयल्सअजिंक्य रहाणेकिंग्ज इलेव्हन पंजाब