RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. RR ने स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली आणि ते क्वालिफायर १मध्ये सहज पात्र ठरतील असे वाटले होते, परंतु त्यांची गाडी घसरली अन् तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले. तेच दुसरीकडे RCB ने पहिल्या ८ सामन्यांत केवळ १ विजय मिळवला होता. मात्र, नंतर सलग सहा सामने जिंकून त्यांनी नेट रन रेटच्या जोरावर CSK ला बाहेर फेकले व प्ले ऑफचे स्थान पक्के केले. त्यामुळे आजच्या सामन्यातही RCB चे पारडे जड मानले जात आहे.
जॉस बटलर राष्ट्रीय कर्तव्यासाठी गेल्याने RR ची बाजू कमकुवत झाली आहे. तेच RCB लाही विल जॅक्स व रिसे टॉप्ली यांनाही मायदेशात जावे लागले आहे. पण, विराट कोहलीचा फॉर्म ही RCB साठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विराटने १४ सामन्यांत ५ अर्धशतक व १ शतकासह सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत. RR नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB प्रथम फलंदाजीला येणार आहे. राजस्थानच्या ताफ्यात शिमरोन हेटमायर परतल्याने त्यांच्या फलंदाजीची फळी डिप झाली आहे. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अप्रतिम यॉर्करवर फॅफ ड्यू प्लेसिसला पाडले. पण, दुसऱ्या षटकात संदीप शर्माच्या गोलंदाजीवर विराट व फॅफने हात मोकळे केले.
बोल्टला सावध खेळण्याचा डाव RCB च्या ओपनर्सने आखला होता. आवेश खानने टाकलेल्या चौथ्या षटकात दोघांनी १७ धावा चोपल्या. बोल्टच्या तिसऱ्या षटकात फॅफने पूल शॉट खेचला, परंतु रोव्हमन पॉवेलने पुढे झेप घेत अविश्वसनीय झेल टीपला आणि फॅफ १७ धावांवर माघारी परतला. RCB ला ३७ धावांवर पहिला झटका बसला.
पण, विराटने २९ धावा आज करून आणखी एक विक्रम रचला. आयपीएलमध्ये २५१ सामन्यांत त्याने ८ शतकं व ५५ अर्धशतकांसह सर्वाधिक ७९७१ धावा केल्या आहेत. २९ धावा करताच तो आयपीएलमध्ये ८००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याच्यानंतर शिखर धवन हा ६७६९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.