नवी दिल्ली : न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) सध्या खूप चर्चेत आहे. त्याने त्याचे आत्मचरित्र 'ब्लॅक अँड व्हाईट' मधून आपल्या सोबत झालेल्या गैरव्यवहारांचा खुलासा केला आहे. अलीकडेच त्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या (RR) तत्कालीन मालकांवर गंभीर आरोप केले होते. आता किवी फलंदाजांने पुन्हा एकदा गंभीर आरोप करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. टेलर जेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाचा हिस्सा होता तेव्हा संघाचा तत्कालीन कर्णधार वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) लाईव्ह सामन्यात आपल्याला रागाने धक्काबुकी केल्याचा आरोप त्याने केला आहे.
आयपीएलमुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैत्रीची भावना तयार होत असते. अनेक भारतीय खेळाडूंची विदेशी खेळाडूंसोबत अत्यंत जवळीक निर्माण होते. मात्र रॉस टेलरने आपल्या आत्मचरित्रात केलेल्या आरोपांमुळे आयपीएलची बदनामी देखील होत आहे. टेलरने आपल्या आत्मचरित्रात लिहले, २०१२ मध्ये जेव्हा त्याचा दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत करार झाला होता, तेव्हा एकदा संध्याकाळी तो वीरेंद्र सेहवागसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होता. यादरम्यान, एक फुटबॉल सामना पाहत असताना, रॉस कोळंबी खात होता आणि त्याचवेळी सेहवाग त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होता.
सेहवागने धक्काबुकी केली
रॉस टेलरच्या म्हणण्यानुसार रेस्टॉरंटमधील घटनेनंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या संघाचा सामना होता. ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग ताबडतोब फलंदाजी करता होता तर दुसरीकडे सर्व विदेशी फलंदाज धावा काढण्यासाठी संघर्ष करत होते. रॉस टेलर देखील चिंतेत होता कारण फ्रँचायझीने त्याला मोठ्या किमतीला खरेदी केले होते. अशा परिस्थितीत तो खेळपट्टीवर खेळत असताना सेहवागने त्याला रागाने धक्काबुक्की केली. "सेहवाग माझ्याकडे आला आणि मला लाईव्ह सामन्यात धक्का मारला आणि म्हणाला, रॉस काल तू ज्यापद्धतीने कोळंबी खात होतास तशी फलंदाजी कर", असे टेलरने आरोप करताना म्हटले.
राज कुंद्रावर केला होता मारहाणीचा आरोप
२०११ च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा टेलर शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर संघ मालकाने तुला शून्यावर बाद होण्यासाठी पैसे देत नाही, असे विधान करून कानाखाली वाजवली, असा दावा किवी खेळाडूने केला. त्यानंतर RR मालक म्हणजे राज कुंद्रा ( Raj Kundra) यांनी हे कृत्य केले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजस्थान रॉयल्सने या मुद्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याचा पवित्रा घेतलेला आहे.
रॉस टेलर नेमका काय म्हणाला होता?
जेव्हा तुमच्यावर प्रचंड पैसा गुंतवला जातो, तेव्हा तुम्हीही स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असता आणि ज्यांनी पैसा लावला आहे त्यांच्या अपेक्षाही अधिक असतात. हे व्यावसायिक आहे. राजस्थान आणि पंजाब किंग्स यांच्यात मोहाली येथे सामना होता. १९५ धावांचा पाठलाग करताना मी शून्यावर LBW झालो आणि आम्हाला तो सामना जिंकता आला नव्हता. त्यानंतर जेव्हा आम्ही, सपोर्ट स्टाफ व संघ व्यवस्थापन हॉटेलच्या बारमध्ये होते. तेव्हा तेथे लिझ हर्ली व शेन वॉर्नही होते. RRचा एक मालक माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, शून्यावर बाद होण्यासाठी आम्ही तुला पैसे देत नाही. त्याने मला ३-४ वेळा कानाखाली वाजवली. त्यानंतर तो हसू लागला, त्याने जोरात मारलेले नव्हते, परंतु मला आश्चर्य वाटले. पण, व्यावसायिक खेळात असेही घडू शकते, याची कल्पना कधी केली नव्हती.