Join us  

Rohit Sharma: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा विजेता कोण, रोहित शर्मानं स्पष्टचं सांगितलं, म्हणाला...

Rohit Sharma: भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या महिन्यात आटोपलेल्या कसोटी मालिकेत मँचेस्टरमध्ये होणारा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 7:10 PM

Open in App

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या महिन्यात आटोपलेल्या कसोटी मालिकेत मँचेस्टरमध्ये होणारा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. या मालिकेत भारत २-१ ने पुढे होता. मात्र पाचवा सामना रद्द झाल्याने मालिकेच्या निकालाबाबत दीर्घ चर्चा सुरू आहे. भारतीय संघाने या सामन्यातून माघार घेतल्याने यजमान संघ विजेता आहे असा दावा इंग्लंडने केला होता. मात्र वाद वाढल्यानंतर इंग्लंडने हा दावा मागे घेतला होता. ( Who is the winner of India-England Test series, Rohit Sharma said clearly, India is  the winner)

त्यानंतर याबाबत आयसीसी, बीसीसीआय आणि ईसीबी हे मिळून अंतिम निर्णय घेतील. आता यावर जो निकाल येईल तो येईल. मात्र भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या मालिकेचा विजेता कोण हे स्पष्टपणे सांगितले आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघच विजेता आहे, असे रोहित शर्माने म्हटले आहे. रोहित शर्माने स्वत: या मालिकेत दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते.

रोहित शर्माने एका स्पोर्ट्स वेअर ब्रँड्सच्या व्हर्च्युअल प्रेस कॉन्फ्रन्समध्ये सांगितले की, माझ्या मते भारतीय संघच या मालिकेतील खरा विजेता आहे. मात्र अजून अंतिम निकाल आलेला नाही. आता हा निकाल बीसीसीआय, आयसीसी आणि ईसीबी निश्चित करतील. मात्र माझ्या दृष्टीकोनातून सांगायचं तर आम्ही मालिका जिंकली आहे. शेवटच्या कसोटीचं आता काय होईल मला माहिती नाही. आता आम्ही एकमेव कसोटी सामना खेळणार की मालिकेचा निर्णय चार सामन्यांच्या आधारावर दिला जाईल, याची काहीच कल्पना नाही. मात्र मला वाटते की, टीम इंडियाने ही मालिका जिंकली आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफमधील तीन अन्य सदस्य कोरोनाबाधित झाल्याने भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. तेव्हापासून या सामन्याच्या निकालाबाबत वाद सुरू आहे. 

रोहित शर्माने या कसोटी मालिकेत जोरदार खेळ केला होता. त्याने चार कसोटींमध्ये पन्नासहून अधिकच्या सरासरीने ३६८ धावा कुटल्या होत्या. त्यामध्ये १ शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या कामगिरीबाबत रोहितने सांगितले की, मी याला सर्वोत्तम खेळ म्हणणार नाही. कारण कसोटी क्रिकेटमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी व्हायची आहे. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App