भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने बुधवारी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहित शर्माने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. आयपीएल २०२५ नंतर इंग्लंड दौऱ्यात तो ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, या आगामी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर होण्याआधीच त्याने मोठा निर्णय घेतला. आता सोशल मीडियावर चाहत्यांकडून आरोप केला जात आहे की, रोहितने निवृत्ती जाहीर करण्याआधीच त्याला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. या मालिकेत रोहित शर्माला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल, अशा बातम्या येऊ लागल्या. मात्र, त्यावेळी रोहितने निवृत्तीचे वृत्त फेटाळले. अखेर बुधवारी रोहित शर्माने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून निवृत्तीची घोषणा केली.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्मा म्हणाला की 'भारताच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राहीन', असे त्याने म्हटले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला, जो भारताने गमावला होता.
चाहत्यांचा आरोप
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्माच्या घोषणेच्या १ तास आधी बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली, असे रोहितचे चाहते बोलत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
रोहित शर्माची कसोटी कारकिर्द
रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१३ मध्ये भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आपल्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत एकूण ६७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४ हजार ३०१ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने एकूण १२ शतक आणि १८ अर्धशतक झळकावली आहेत. कसोटीत २१२ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
Web Title: Rohit Sharma was removed as India Test captain, not that he stepped down, Fans allegation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.