Join us

"रोहित, विराटची अवस्था बाबरसारखीच, ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी दोघांनी..."; पाकिस्तानी क्रिकेटर बरसला

Rohit Sharma Virat Kohli, IND vs NZ 3rd Test: तीन कसोटीतील ६ डावांत विराटच्या एकूण ९३ तर रोहितच्या ९१ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 09:44 IST

Open in App

Rohit Sharma Virat Kohli, IND vs NZ 3rd Test: न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात मायदेशात व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी साऱ्यांनाच निराश केले. रिषभ पंत, शुबमन गिल, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर या काही मोजक्या खेळाडूंनीच लौकिकाला साजेशी खेळी केली. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन बड्या फलंदाजांनी चाहत्यांची घोर निराशा केली. आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात दोघांनीही अतिशय सुमार दर्जाची फलंदाजी केली. तीन सामन्यांतील ६ डावांत मिळून विराटने ९३ तर रोहितने ९१ धावा केल्या. त्यांच्या या वाईट कामगिरीवर पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूनेही सडकून टीका केली.

"रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांचीही अवस्था सध्या बाबर आझम सारखीच झाली आहे. सगळ्यांचा फलंदाजीचा फॉर्म एकदम खराब आहे. रोहित शर्मा दोन चेंडू मिस झाला, त्यानंतर चेंडू पॅडवर लागला, त्यापुढे कमरेच्या खालीही लागला. मग रोहित कावराबावरा झाला, त्याने पुढे येऊन चौकार लगावला. नंतर रिव्हर्स स्वीप खेळून चौकार मारला. यावरून कळतं की रोहितचं फूटवर्क फारसं चांगलं नाही. त्याचा फॉर्म चांगला नाही. विराट कोहलीही फलंदाजी करताना हरवलेला दिसला. तो फॉर्ममध्ये नव्हता. ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी विराट आणि रोहितने देशांतर्गत स्थानिक क्रिकेट खेळून घेतलं पाहिजे. त्यातून त्यांना कसोटी क्रिकेटचा सराव मिळेल," असे रोखठोक मत पाकिस्तानच्या बासित अलीने मांडले.

तिसऱ्या कसोटीत काय घडलं?

दोन कसोटी हरून पिछाडीवर असलेल्या भारताने वानखेडेवर तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ वर ऑलआऊट केले. त्यानंतर भारताचा पहिला डाव २६३ वर संपला आणि भारताला थोडी आघाडी मिळाली. तिसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ १७४ वर बाद झाला. भारताला १४७ धावांचे आव्हान होते. पण रिषभ पंतच्या अर्धशतकाशिवाय इतर कुणीही फलंदाजी चांगली फलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव १२१ धावांत आटोपला आणि न्यूझीलंडने २५ धावांनी सामना जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहली