Join us  

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

वीरेंद्र सेहवाग सदस्य असलेल्या समितिनं केली निवड...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:27 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांची यंदा क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.रोहित व विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मरियप्पन थंगवेलू व भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांच्या नावाचीही शिफारस झाली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते. खेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (२०००) व सरदारसिंग (२०१७) यांना हा गौरव प्राप्त झाला होता. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ ला कालावधीत रराणीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना २०१७ ला महिला आशिया चषक जिंकून दिला. २०१८ च्या आशिया चषकात संघाने रौप्य पदक जिंकले तसेच २०१९च्या एफआयएच आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल करीत तिने संघाला टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठून दिली होती. विनेशने २०१८च्या राष्टÑकुल स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण व २०१९ च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य पदक जिंकले होते.टेटे खेळाडू मनिका बत्राने २०१८ राष्टÑकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्ण व आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. थंगवेलूने रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले.दुसरीकडे, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह २९ खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. दत्तू भोकनळ (रोइंग) राहुल आवारे (कुस्ती) मधुरिका पाटकर (टेबल टेनिस) आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. आॅलिम्पिक कांस्य विजेती मल्ल साक्षी मलिक व माजी विश्वविजेती भारोत्तोलक मीराबाई चानू यांनाही समितीने पसंती दिल्याची माहिती आहे. दोघींचा या आधी ‘खेलरत्न’ने गौरव झाला आहे.>पुरस्कार सोहळा आॅनलाईन होण्याची शक्यताकोरोना व्हायरसमुळे यंदा प्रथमच राष्टÑपती भवनात २९ आॅगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा आॅनलाईन होण्याची शक्यता आहे. सर्व विजेते आपापल्या ठिकाणी लॉगइन करून स्वत:च्या नावाची घोषणा होताना ऐकतील. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या निर्देशानुसार समारंभाच्या दिवशी सकाळी विजेत्यांच्या नावाची घोषणा होईल. कोरोनामुळेच मंत्रालयाने जून महिन्यात पुरस्कारासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवली होती. लॉकडाऊनमुळे शिफारसकर्त्या लोकांना शोधण्यास अडसर जाऊ नये यासाठी खेळाडूंना स्वत:च्या नावाची शिफारस करण्याची मुभा देण्यात आली होती. यामुळेच यंदा मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले होते.>रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता. २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचे नाव खेलरत्नसाठी दिले होते. 

टॅग्स :रोहित शर्माविनेश फोगट