Join us  

फायनलमध्ये प्रवेश तरीही रोहित शर्मा नाखूश, सांगितली संघातील सर्वात मोठी उणीव, म्हणाला...

ICC CWC 2023, Ind Vs NZ: बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मात्र न्यूझीलंडवरील दणदणीत विजयानंतरही रोहित शर्माने संघातील काही उणिवांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:07 PM

Open in App

बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला असून, सर्वच्या सर्व १० सामने भारताने जिंकले आहेत. मात्र न्यूझीलंडवरील दणदणीत विजयानंतरही रोहित शर्माने संघातील काही उणिवांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की,मी वानखेडेवर खूप क्रिकेट खेळलो आहे. या मैदानावर कितीही धावा बनवल्या तरी तुम्ही निश्चिंत होऊ शकत नाही. आम्हाला आमचं काम पूर्ण करायचं होतं. आमच्यावर दबाव आहे, हे आम्हाला माहिती होते. आम्ही मैदानावर आज खराब क्षेत्ररक्षणानंतरही हिंमत हरली नाही. या स्पर्धेचा कालावधी बराच मोठा आहे. आम्ही ९ सामन्यांमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मात्र कुठल्या तरी सामन्यामध्ये असं होऊ शकतं. मात्र अखेरीच आम्ही विजय मिळवला याचा आम्हाला आनंद आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला असला तरी भारताचं क्षेत्ररक्षण खूपच सुमार झालं होतं. शमीपासून रोहित शर्मापर्यंत सर्वांनीच झेल सोडले होते. तसेच फलंदाजाला धावबाद करण्याच्याही काही संधी दवडल्या होत्या.

यावेळी रोहित शर्माने मोठ्या आव्हानाचा जबरदस्त पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि डेरेल मिचेल यांचंही कौतुक केलं. तसेच भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून देण्याचं श्रेय मोहम्मद शमीला दिलं. रोहित म्हणाला की, विल्यम्सन आणि मिचेल यांनी जबरदस्त फलंदाजी केली. आमच्यासाठी हिंमत कायम राखणं महत्त्वाचं होतं. एक वेळ अशी आली होती की, स्टेडियममधील सर्व क्रिकेटप्रेमी शांत झाले होते. मात्र सामन्याचं चित्र बदलण्यासाठी एक झेल किंवा धावबाद होण्याची गरज होती, याची आम्हाला जाणीव होती. शमीने भेदक गोलंदाजी केली. तसेच मोठी धावसंख्या उभारण्यासाठी फलंदाजांनी केलेल्या जबरदस्त फलंदाजीचंही रोहितने कौतुक केलं. 

रोहित म्हणाला, आमच्या फलंदाजी फळीतील वरचे ५-६ फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते त्याचा फायदा घेतात. या स्पर्धेत अय्यने केलेली फलंदाजी पाहून समाधान वाटले. शुभमन गिलने ज्या प्रकारे फलंदाजी केली तीसुद्धा जबरदस्त होती. दुर्दैवाने काल त्याला दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर जावं लागलं. तर विराट कोहलीने ज्याच्यासाठी त्याला ओळखलं जातं, अशी फलंदाजी केली. त्याने ऐतिहासिक शतकही पूर्ण केलं, असे रोहित म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारतीय संघावर दबाब होता हेही रोहितने मान्य केले. रोहित म्हणाला, निश्चितच हा उपांत्य फेरीचा सामना होता. आमच्यावर कुठलास दबाव नव्हता, असं मी म्हणणार नाही. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा दबाव हा असतोच. उपांत्य फेरीत दबाव थोडा जास्त असतो. आम्ही याबाबत जास्त विचार करू इच्छित नव्हतो. गेल्या ९ सामन्यांध्ये जे काही केलं, तेच आम्हाला करायचं होतं, असे रोहितने सांगितले. भारतीय संघाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी चौथ्यांदा गाठली आहे. याआधी १९८३, २००३, २०११ मध्ये भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.  

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडवन डे वर्ल्ड कप