Join us  

रोहित शर्मा घेणार ब्रेक; नव्या वर्षातील पहिल्याच मालिकेतून विश्रांती

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 3:08 PM

Open in App

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं पाच शतकं झळकावली होती. ट्वेंटी-20तही त्यानं समाधानकारक कामगिरी केली आहे. रोहित एक वर्ष सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे तो 2020मध्ये ब्रेक घेणार असल्याची शक्यता आहे. 

वेस्ट इंडिजच्या मालिकेत रोहितनं श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. कॅलेंडर वर्षात सर्वात अधिक धावा करणाऱ्या सलामीवीराचा मान रोहितनं पटकावला. पुढील वर्षी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून रोहित विश्रांती घेऊ शकतो. ''ट्वेंटी-20 टीममधल्या संघातील एखाद्या खेळाडूला निवड समिती विश्रांती देत नाही, परंतु रोहित याला अपवाद ठरू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती मिळावी, अशी विनंती रोहितनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) केली आहे,'' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यात रोहित खेळण्याची शक्यता कमी आहे. 2019मध्ये रोहितनं 5 कसोटी सामन्यांत 556 धावा केल्या आहेत. 28 वन डे सामन्यांत 1490 आणि 14 ट्वेंटी-20 सामन्यांत 396 धावा केल्या आहेत. 2019मध्ये तीनही फॉरमॅटमध्ये रोहितनं एकूण 2442 धावा चोपल्या आणि त्यानं सनथ जयसूर्याचा 1997चा 2387 धावांचा विक्रम मोडला. 

टॅग्स :रोहित शर्माभारतश्रीलंका