आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील आपला फॉर्म देशांतर्गत क्रिकेटमध्येही कायम ठेवत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं कडक अर्धशतकी खेळी साकारली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं चौकार षटकारांची बरसात करत अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्याच्या भात्यातून आलेली हे चौथे अर्धशतक आहे. तो जवळपास १० वर्षांनी या स्पर्धेत खेळत आहे. याआधी २०१०-११ च्या हंगामात रोहित या स्पर्धेत मुंबईकडून खेळताना दिसला होता.
सिक्कीमच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ बाद २३६ धावा करत मुंबईच्या संघासमोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मानं युवा अंगकृष्ण रघुवंशीच्या साथीनं डावाची सुरुवात केली. एका बाजूला युवा बॅटर संयमी खेळी करत असताना दुसऱ्या बाजूला अनुभवी रोहितनं क्लास खेळीचा नजराणा पेश करत मुंबईच्या संघाला अपेक्षेप्रमाणे दिमाखदार सुरुवात करून दिली.