Join us  

रोहितने टी-20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करावे! माजी कर्णधार सौरभ गांगुली यांचे मत

Rohit Sharma : ‘वनडे विश्वचषकात प्रभावी नेतृत्व करणारा अनुभवी रोहित शर्मा याने जून २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या कर्णधारपदी कायम असायला हवे,’ असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 9:22 AM

Open in App

कोलकाता - ‘वनडे विश्वचषकात प्रभावी नेतृत्व करणारा अनुभवी रोहित शर्मा याने जून २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या कर्णधारपदी कायम असायला हवे,’ असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.

रोहितच्या नेतृत्वात भारताने सलग दहा सामने जिंकून विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून सहा गड्यांनी पराभव झाला.  रोहित आणि विराट कोहली यांनी दहा डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना गांगुली म्हणाले, ‘पुढील व्यस्त वेळापत्रकाला सामोरे जाण्यासाठी दोघांनाही सध्या विश्रांतीची गरज आहे. रोहितने संघात परतल्यानंतर सर्वच प्रकारांत संघाचे नेतृत्व करीत राहावे. विश्वचषकातील त्याची शानदार कामगिरी पुढेही सुरू राहायला हवी, असे अनेकांना वाटते. रोहित कसा खेळला हे विश्वचषकात पाहिले असेलच, तो भारतीय क्रिकेटचा अभिन्न भाग आहे.’

रोहित-विराट हे २०२२ च्या टी-२० विश्वचषकापासून टी-२० प्रकारात खेळलेले नाहीत. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक टी-२० त कर्णधारपदाचा दावेदार होता, पण तो देखील जखमी असल्याने सूर्यकुमार यादव सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध या प्रकारात संघाचे नेतृत्व करतोय. गांगुली म्हणाले, ‘विश्वचषक आणि द्विपक्षीय मालिकांमध्ये दडपणाचा स्तर वेगळा असतो. यंदा विश्वचषकात भारताने शानदार कामगिरी केली. सहा महिन्यानंतर वेस्ट इंडीजमध्ये याच कामगिरीची पुनरावृत्ती होईल.  रोहित हा लीडर असल्याने टी-२० विश्वचषकात तोच कर्णधार असेल, अशी मला खात्री आहे.’

 बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळाचा टी्-२० विश्वचषकापर्यंत विस्तार केला. त्यांच्या कार्यकाळाचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. गांगुली अध्यक्षपदी असताना द्रविड प्रशिक्षक बनले होते. आता द्रविड यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराचे गांगुली यांनी अभिनंदन केले. आनंद व्यक्त करीत ते म्हणाले, ‘द्रविड यांच्यावर विश्वास दाखविल्याचा मला आनंद वाटतो. मी अध्यक्षपदी असताना द्रविड यांना पद स्वीकारण्याची विनंती केली होती.’ भारताने विश्वचषक जिंकला नसेल पण भारतच स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संघ होता. सात महिन्यांनंतर आणखी एक विश्वचषक खेळण्याची संधी असेल. भारत उपविजेता नाही तर, चॅम्पियन असेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.’  कसोटी तज्ज्ञ अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावर गांगुली म्हणाले, ‘कधी ना कधी नव्या प्रतिभांना संधी मिळायला हवी. भारतात मोठ्या प्रमाणावर प्रतिभावान खेळाडू असल्याने पुढे जाण्याची हीच वेळ आहे. पुजारा आणि रहाणे यशस्वी खेळाडू राहिले पण, खेळ सतत तुमची साथ देत नाही. भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी दोघांचेही अभिनंदन करायला हवे.’

 

टॅग्स :रोहित शर्मासौरभ गांगुली