Join us  

श्रीलंकेच्या 'या' चाहत्यासाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही, असं काही केलं की सर्वजण करत आहेत स्तुती

अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे श्रीलंकेच्या मोहम्मद निलामसाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी श्रीलंकेला जाता यावं यासाठी रोहित शर्माने त्याला मदत केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 3:39 PM

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेटर आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणा-या रोहित शर्माचे चाहते फक्त भारतात नाही तर श्रीलंकेतही आहे. रोहित शर्माने अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे या चाहत्यासाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी श्रीलंकेला जाता यावं यासाठी रोहित शर्माने त्याला मदत केली होती. आपल्या चाहत्याला अशाप्रकारे मदत केल्याबद्दल रोहितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या श्रीलंकेच्या चाहत्याचं नाव आहे मोहम्मद निलाम.

मोहम्मद निलाम टी-20 मालिका संपल्यानंतर 26 डिसेंबरलाच मुंबईहून श्रीलंकेला परतणार होता. पण कोलंबोत राहणा-या त्याच्या वडिलांची तब्बेत बिघडल्याने तात्काळ मायदेशी परतावं लागणार होतं. मोहम्मद निलामच्या वडिलांना गळ्याचा कॅन्सर होता, ज्यामुळे त्यांच्यावर सर्जरी करणं गरजेचं होतं. मोहम्मद निलामला दिल्लीमधील फिरोज शाह कोटला मैदानावर खेळण्यात आलेल्या तिस-या आणि शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान ही माहिती मिळाली. पण मोहम्मद निलामच्या तिकीटाची सोय होत नव्हती. यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि सचिन तेंडुलकरचा चाहता सुधीरने रोहित शर्माला याबद्दल सांगितलं. यानंतर रोहित शर्माने कोलंबोची तिकीट मिळवून देण्यासाठी मोहम्मद निलामला मायदेशी जाण्यासाठी मदत केली. 

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद निलाम म्हणाला आहे की, 'माझी मदत केल्याबद्दल मी रोहित शर्माचा ऋणी आहे. तो खूप चांगला माणूस असून त्याचं मन खूप मोठं आहे. त्याने 208 धावा केल्यानंतर मला खूपच आनंद झाला'.

फक्त रोहित शर्माच नाही तर विराट कोहलीनेदेखील मोहम्मद निलामला मेसेज करत मदत करण्यासाठी हात पुढे केला होता. आपल्या लग्नात व्यस्त असतानाही विराटने वेळ काढून मदतीसाठी तयारी दर्शवली होती. 'विराटने मला मेसेज केला आणि वडिलांच्या तब्बेतीची चौकशी केली. काही मदत हवी असेल तर मला सांग असंही त्याने सांगितलं होतं', असं मोहम्मद निलाम सांगतो. आपल्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल सांगताना त्याने माहिती दिली की, 'आता त्यांची तब्बेत चांगली आहे. सर्जरी व्यवस्थित पार पडली आहे. घरी परतायचं होतं तेव्हा मला खूप टेंशन आलं होतं, पण रोहितने मदत केल्याने खूप मोठं संकट टळलं'. 

टॅग्स :रोहित शर्माक्रिकेटभारतीय क्रिकेट संघश्रीलंका