विजय हजारे ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध उत्तराखंड या सामन्यादरम्यान मुंबईचा उदयोन्मुख यष्टिरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशी क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण क्रिकेट वर्तुळात त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
उत्तराखंडच्या डावातील ३०व्या षटकात तनुष कोटियनच्या गोलंदाजीवर सौरभ रावतने स्लॉग-स्वीप फटका मारला. डीप मिड-विकेट सीमेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या रघुवंशीने झेल पकडण्यासाठी पुढे धावत झेप घेतली. मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि डोके जमिनीवर आपटले.घटना घडताच रघुवंशी वेदनेत दिसून आला. मुंबईचे खेळाडू आणि वैद्यकीय पथक तत्काळ मैदानात दाखल झाले. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, त्याला मानेखाली दुखापत झाल्याची शक्यता आहे. मात्र, डॉक्टरांच्या सविस्तर तपासणीनंतरच त्याच्या दुखापतीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळेल.