भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाच्या डगआऊटजवळ कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांच्यात एक अतिशय मजेशीर आणि हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला, ज्यात दोघेही लहान मुलासारखे वागताना दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी डगआऊटजवळ उभे असलेल्या रोहित शर्माच्या चेहऱ्यावर पडलेला पापणीचा केस ऋषभ पंतला दिसला. पंतने तो केस काढून रोहितच्या हातावर ठेवला आणि त्याला 'एक इच्छा माग' असे सांगितले. रोहित शर्मानेही हसत हसत डोळे मिटले आणि इच्छा मागितली. इच्छा मागितल्यानंतर रोहितने लगेच त्या केसावर फुंकर मारली. फुंकर मारल्यावर तो पापणीचा केस कुठे उडाला? हे पाहण्यासाठी दोघेही अचानक वर बघू लागले. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यातील एक खास क्षण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
भारताचा चार विकेट्सने पराभव
या सामन्यात भारताचा स्टार फलंदाजा विराट कोहली आणि युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने द.आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या द.आफ्रिकेच्या संघाने चार विकेट्स राखून हा सामना जिंकला. एडेन मार्क्रमच्या शतकाने (११० धावा) द.आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर मॅथ्यू ब्रेट्झके आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी तुफानी अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. अखेर कॉर्बिन बॉश (२९ धावा) आणि केशव महाराज (१० धावा) यांनी अखेरच्या षटकात द.आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
द.आफ्रिकेची मालिकेत बरोबरी
या विजयासह द.आफ्रिकेच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सामना जिंकणारा संघ मालिकेवर विजयाची मोहर लावेल. महत्त्वाचे म्हणजे, द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. भारताचा एकदिवसीय मालिका जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल. परंतु, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत द.आफ्रिकेच्या संघाने भारताला कडवे आव्हान दिले आहे.