Rohit Sharma, Ranji Trophy Mumbai vs Jammu Kashmir : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळला आणि लाजिरवाणा पराभव स्वीकारून भारतात परतला. त्यानंतर बीसीसीआयने सर्व करारबद्ध क्रिकेटपटूंना देशांतर्गत सामने खेळणे बंधनकारक केले. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार रोहित शर्मा, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा या सर्व खेळाडूंनी रणजीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. रोहित शर्माचा खराब फॉर्म पाहता त्याने पाचव्या कसोटीतून स्वत:ला वगळले होते. त्यानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मुंबईच्या संघासोबत सरावही केला होता. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या मुंबई विरूद्ध जम्मू काश्मीर सामन्यात रोहित काय कमाल दाखवतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण रोहितचा खराब फॉर्म सुरुच राहिल्याने तो १९ चेंडूत केवळ ३ धावा काढून माघारी परतला.
रोहित - यशस्वी दोघेही फ्लॉप
आजपासून सुरु झालेल्या रणजी ट्रॉफीच्या नव्या सामन्यात रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात खेळत आहे. याच संघात यशस्वी जैस्वालदेखील समाविष्ट आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित - यशस्वी जोडी सलामीला आली. यशस्वी जैस्वालने चार धावा केल्या आणि तो माघारी परतला. त्याला अकीब नक्वीने पायचीत केले. त्यापाठोपाठ रोहित शर्मादेखील अतिशय सोप्या चेंडूवर चुकीचा फटका खेळून झेलबाद झाला. पहिल्या डावात झालेल्या चुका सुधारून दुसऱ्या डावात हे दोघे काय बदल करतात हेच पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. पाहा व्हिडीओ-
१७ वर्षांनी जुळून आलाय असा योगायोग
रोहित शर्मा तब्बल १० वर्षांनी रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्यासोबतच रणजी ट्रॉफीमध्ये तब्बल १७ वर्षांनी एक योगायोग जुळून आला आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार रणजी स्पर्धा खेळण्याचा योग तब्बल १७ वर्षांनी जुळून आला आहे. याआधी अनिल कुंबळेच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. २००७ साली कुंबळे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता. त्याचवेळी त्याने हिमाचल प्रदेश संघाकडून रणजी क्रिकेट खेळले. त्यानंतर थेट आता रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असताना रणजी क्रिकेटमध्येही खेळताना दिसत आहे.