- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
रोमांचक सामन्यात रोहित शर्माच्या दोन षटकारांनी सुपर ओव्हरमध्ये पोहचलेला हा सामना भारताने जिंकून न्यूझीलंड आणि चाहत्यांना आश्चर्यचकीत केले. मालिकेत कायम राहण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना जिंकण्याची गरज होती. मात्र रोहितच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे त्यांच्या आशांवर पाणी फेरले गेले. रोहित त्याच्या पराक्रमामुळे आता क्रिकेटच्या लोककथांचा भाग बनू लागला आहे.
सामना टाय झाल्यानंतर केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टिलने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी केली, तेव्हा भारताला विजय मिळवणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत मोठे फटके खेळणारा फलंदाज म्हणून भारताकडे एकमेव रोहितचाच पर्याय होता.
षटकारांच्या पराक्रमामुळे तो आता क्रिकेटच्या लोककथांचा भाग बनू लागला आहे आणि कदाचित त्याचा हा पराक्रम पाहून न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज टिम साऊदीला मानसिक त्रास झाला असेल. त्याने भारताच्या सलामी जोडीला काही चांगले चेंडू टाकले. मात्र अखेरच्या दोन चेंडूत सामना बदलला.
त्याआधी देखील रोहितने ४० चेंडूत ६५ धावा फटकावल्या. रोहितने दिलेला हा वेग भारताला कायम ठेवता आला नाही. त्यामुळे भारताला १७९ धावांवरच समाधान मानावे लागले. भारताला १५-२० धावा कमी पडल्या. रोहितचा पराक्रम नक्कीच कौतुकास्पद असला तरी बुमराहचा आज चांगला दिवस नसल्याने शमीला अखेरच्या षटकांत गोलंदाजी करण्यास सांगण्यात आले. अखेरच्या षटकांत ९ धावा हव्या होत्या. सामना न्यूझीलंडच्या नियंत्रणात होता. टेलरने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र पुढच्या चेंडूवर एक धाव काढून केन विल्यमसन स्ट्राईकला आला. मात्र विल्यमसन ९५ धावांवर बाद झाला. शमीने अखेरच्या चार चेंडूत दोनच धावा दिल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हरची संधी मिळाली.
भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी२० मालिका जिंकली असून अजून दोन सामने
शिल्ल्क आहेत. या भारतीय
संघाने परदेशातील आणखी एक अडचण दूर केली. मालिका विजयाने भारताला या दौऱ्यात मोठा मानसिक फायदा होईल.