रोहित, कोहली, सैनी यांचा दमदार खेळ, कुणाला किती गुण ?

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने यजमान भारताला चांगलीच झुंज दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 05:29 AM2019-12-24T05:29:14+5:302019-12-24T05:29:45+5:30

whatsapp join usJoin us
Rohit, Kohli, Saini's strong play, how many points to someone? | रोहित, कोहली, सैनी यांचा दमदार खेळ, कुणाला किती गुण ?

रोहित, कोहली, सैनी यांचा दमदार खेळ, कुणाला किती गुण ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने यजमान भारताला चांगलीच झुंज दिली. घरच्या मैदानावर खेळत असूनही भारतीय संघाला विजय मिळविण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावावी लागली. मोठा अनुभव आणि जिंकण्याची जिद्द या जोरावर विराट अ‍ॅण्ड कंपनीने बाजी मारली. त्याचबरोबर किएरॉन पोलार्डच्या नेतृत्वात कमालीचा बदल झालेल्या विंडीज संघाकडून टीम इंडियाला कडवी टक्करही मिळाली. मालिकेत २-१ असा विजय मिळविलेल्या विराट सेनेचे सादर केलेले रिपोर्ट कार्ड.

रोहित शर्मा (१० पैकी ८.५ गुण) :
टी२० मालिकेत फारसा यशस्वी न ठरल्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित आपल्या लौकिकानुसार खेळला. मालिकेत तो सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला. दुसऱ्या सामन्यातील त्याची १५९ धावांची खेळी मालिकेत निर्णायक ठरली. यंदाच्या वर्षात तो क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात ‘हिट’ ठरला.
लोकेश राहुल (१० पैकी ८) :
रोहित शर्माचा शानदार जोडीदार ठरलेल्या राहुलने आपला नैसर्गिक खेळ केला. कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर राहुलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले. आता रोहितसह त्याने सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये भक्कम सलामीवीर म्हणून छाप पाडली आहे.
विराट कोहली (१० पैकी ८) :
पहिल्या दोन सामन्यांत कोहलीची जादू दिसली नाही. यापैकी एकदा तो गोल्डन डकचा मानकरी ठरला. मात्र तिसºया व अंतिम सामन्यात त्याने जबरदस्त अर्धशतक ठोकले. अंतिम सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही ३१६ धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते. कर्णधार म्हणून सर्व सूत्रे सांभाळताना कोहलीने पुढे येऊन संघाला विजयी केले.

श्रेयस अय्यर (१० पैकी ७) :
मालिकेत केलेल्या दोन धमाकेदार अर्धशतकी खेळींद्वारे श्रेयसच्या कामगिरीतील वेगवान प्रगती दिसून येते. त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्याकडे असलेले सर्व प्रकारचे फटके यामुळे तो फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज दिसतो.
रिषभ पंत (१० पैकी ५.५) :
रिषभसाठी ही मालिका संमिश्र ठरली. ७१ धावांची वेगवान खेळी करत त्याने फलंदाज म्हणून आपली गुणवत्ता दाखवली. पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करत निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल. यष्टींमागेही तो अनेकदा चुकला. त्यामुळे पंतला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल.
केदार जाधव (१० पैकी ५) :
आघाडीचे फलंदाज धावा काढत असल्याने केदारला फारशी संधी मिळाली नाही. सीमारेषेवर केलेल्या शानदार क्षेत्ररक्षणाद्वारे त्याने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले. संपूर्ण मालिकेत त्याने केवळ एक षटक टाकले याचे आश्चर्य वाटले.

रवींद्र जडेजा (१० पैकी ६.५) :
फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर गोलंदाज म्हणून जडेजा फारशी छाप पाडू शकला नाही. पण त्याचा इकोनॉमी रेट वाईटही नव्हता. अंतिम सामन्यात फलंदाजीतून जडेजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय क्षेत्ररक्षणात नेहमीप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केली. अष्टपैलू गुणवत्तेमुळे संघ व्यवस्थापन त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही.
शिवम् दुबे (१० पैकी २) :
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत युवा अष्टपैलू शिवम दुबे अपयशी ठरला. त्याला फलंदाजी व गोलंदाजीत आणखी प्रगती करावी लागेल. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये भक्कम स्थान मिळविण्यासाठी दुबेला मेहनत करावी लागेल. त्याने खेळलेल्या सामन्यातून नक्कीच कुठे सुधारणा करावी लागेल हे कळले असेल.
शार्दुल ठाकूर (१० पैकी ५) :
अखेरच्या सामन्यात छोटी मात्र निर्णायक आक्रमक खेळी करत ठाकूरने भारताच्या मालिका विजयात मोलाचे योगदान दिले. गोलंदाज म्हणून तो महागडाच ठरला. खेळपट्टी सपाट होती हे यामागचे कारण आहे, मात्र त्याचवेळी त्याला मोठे फटके खेळणाºया विंडीज फलंदाजांविरुद्ध नियंत्रित मारा करता आला नाही.

दीपक चहर (१० पैकी ६.५) :
दोन सामन्यांत मिळून दीपकला केवळ एक बळी घेता आला. पण त्याचवेळी तो सर्वांत कमी धावा देणारा गोलंदाजही ठरला. त्यामुळे सफेद चेंडूच्या क्रिकेटमधील त्याचे महत्त्व कळून येते. वेगाने मारा करण्याची क्षमता असली, तरी गोलंदाजीतील वैविधता आणि नियंत्रण यामुळे तो अधिक प्रभावी ठरतो.
मोहम्मद शमी (१० पैकी ७) :
बुमराह आणि भुवनेश्वर यांच्या अनुपस्थित शमीने भारतीय आक्रमणाची धुरा सांभाळली. सपाट खेळपट्टीवर त्याला फारसे काही करता आले नाही; पण दुसºया सामन्यात त्याने अचूक मारा करताना भारताला बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कुलदीप यादव (१० पैकी ७) :
दुसºया सामन्यात घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर कुलदीपने भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्याने विंडीज फलंदाजांना गोंधळात पाडले. पण त्याचवेळी मालिकेत त्याला हेच तीन बळी मिळविता आले याकडेही लक्ष द्यावे लागेल. इकोनॉमी रेट चांगला असला, तरी संघ व्यवस्थापन त्याच्याकडे ‘विकेट टेकर’ म्हणून पाहत आहे.
नवदीप सैनी (१० पैकी ७.५) :
सैनीने जबरदस्त पदार्पण करताना सर्वांनाच आपल्या वेगाने, नियंत्रणाने आणि वैविध्यतेने प्रभावित केले. उंच शरीरयष्टी आणि अचूकतेच्या जोरावर सपाट खेळपट्टीवरही बाऊन्सर मारा करत तो फलंदाजांना चकवतो. याशिवाय लेट स्विंगने त्याच्या गोलंदाजीची धार अधिक वाढते. त्याच्याकडे भविष्यातील प्रमुख गोलंदाज बनण्याची क्षमता नक्कीच आहे.

(लेखक लोकमत वृत्तसमुहात कन्सल्टिंग एडिटर आहेत)

Web Title: Rohit, Kohli, Saini's strong play, how many points to someone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.