मुंबई: माजी महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकरने 26 नोव्हेंबर रोजी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोसह त्याने जे कॅप्शन दिलं त्यामुळे हा फोटो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. या फोटोमध्ये रोहनने स्वतःचीच खिल्ली उडवली. त्याने स्वतःला बॉटल उघडण्याचं ओपनर असं म्हटलं.
एका कार्यक्रमात रोहनने सचिन आणि सेहवागसोबत फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने ''भारताचे तीन महान ओपनर्स... तेंडुलकर,गावसकर आणि सेहवाग'' असं म्हटलं. ''हे दोन्ही क्रिकेटचे ओपनर्स आहेत तर मी बॉटलचा'' असं कॅप्शन त्याने टाकलं.
त्याने शेअर केलेला हा फोटो अनेकांनी लाइक आणि रिट्विट केला. त्याचं हे कॅप्शन पाहून अभिषेक बच्चनलाही हसू आवरलं नाही. त्याच्या ट्विटला रिप्लाय करताना इमोजीच्या माध्यमातून अभिषेकने आपल्या भावना व्यक्त केल्या.
रोहन त्याच्या क्रिकेट कारकिर्दित वडिलांप्रमाणे नाव कमावू शकला नाही. सुनिल गावसकर हे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज होते. तर रोहन गावसकरने 11 वनडे सामने खेळले आणि केवळ 151 धावा केल्या. सध्या तो क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसतो.