लंडन : न्यूझीलंडविरुद्धच्या १० जूनपासून दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने ऑफस्पिनर डोम बेसचा संघात समावेश केला आहे. लॉर्ड्सवर पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन सध्या निलंबित आहे.
जुने ट्विट व्हायरल झाल्यामुळे रॉबिन्सनला कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे बेसचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. तरीही इंग्लंडच्या अडचणीत भर पडली. रॉबिन्सनप्रमाणे डोम बेसचेही निलंबन होऊ शकते. त्याचे जुने आणि वादग्रस्त ट्विट व्हायरल झाले. क्रिकबझच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फिरकीपटू म्हणून जॅक लीच इंग्लंडची पहिली पसंती आहे.
कोच सिल्व्हरवूूड म्हणाले, “बेस रविवारी टीम हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याला ४८ तासांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. योजनेनुसार सर्व नीट झाले, तर बेस बुधवारपासून संघाबरोबर प्रशिक्षण घेईल.” यापूर्वी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध बेसने कसोटी सामना खेळला होता.
ओली रॉबिन्सनचे ट्विट१ ‘माझे नवे मुस्लिम मित्र बॉम्ब आहेत. (विशिष्ट धर्माच्या लोकांना दहशतवादी संबोधण्याचा प्रकार.)२ ‘आशियाई लोक अशाप्रकारे हास्य करतात, याचे मला आश्चर्य वाटते!’ (विशेषत: चीनमधील लोकांच्या चहेऱ्यांबाबत भाष्य करीत मी स्वत: वर्णद्वेषी आहे, हे दाखवून दिले.)३ रेल्वेत माझ्यासोबत जी व्यक्ती बसली आहे, त्याला निश्चितपणे इबोला झाला असावा’! (समाजात द्वेष पसरविणे आणि निकृष्ट ठरवून डिवचण्याचा प्रकार.)
भारतीय राष्ट्रगीताबद्दल डोम बेसचे वादग्रस्त ट्विट२०१३ च्या चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान भारतीय संघाच्या राष्ट्रगीताबद्दल बेसच्या ट्विटर अकाउंटवरून वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते. शिवाय त्याने महेंद्रसिंह धोनीच्या बॅट बदलण्याच्या बाबतीतही विधान केल्याचे समोर आले. या व्हायरल झालेल्या ट्विटनंतर बेसने आपले ट्विटर अकाउंट बंद केले.
‘ओली रॉबिन्सनचे ट्विट अवमानकारक आणि चुकीचे होते; पण ती एक दशक जुनी गोष्ट होती. एका तरुण मुलाने ती चूक केली होती. तो तरुण मुलगा आता माणूस झाला असून त्याने माफी मागितली आहे. ईसीबीने रॉबिन्सनला निलंबित करून हे चुकीचे केले. त्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे.’-बोरिस जॉन्सन, पंतप्रधान, ब्रिटन.
‘१८ वर्षांच्या मुलाने केलेली चूक मोठी असली तरी त्यावेळी त्याचे वय कमी होते. त्याची कारकीर्द लक्षात घेता ईसीबीने त्याला समज देऊन मोकळे करायला हवे.’- नासीर हुसेन, माजी कर्णधार