टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी आणि गुजरातच्या शिक्षणमंत्री रिवाबा जडेजा यांनी भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना रिवाबा यांनी जडेजाचे कौतुक करताना टीम इंडियातील इतर खेळाडू 'चुकीचे काम' करत असल्याचे जाहीरपणे म्हटले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
रिवाबा जडेजा यांनी त्यांचे पती रवींद्र जडेजा किती जबाबदार व्यक्ती आहेत, हे स्पष्ट करताना टीममधील इतर खेळाडूंवर निशाणा साधला. रिवाबा म्हणाल्या की, "माझ्या पतीला क्रिकेट खेळण्यासाठी लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये जावे लागते. तरीही, आजपर्यंत त्यांनी कोणतेही व्यसन केले नाही. परंतु, संघातील इतर सर्व खेळाडू चुकीचे काम करतात. माझ्या पतीला असे चुकीचे काम करू शकतात, पण ते करत नाहीत कारण ते आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे समजतात. मात्र, त्या कोणत्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोलले, याबाबत अस्पष्टता आहे.
रिवाबा जडेजा या गुजरात विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदार बनल्या आहेत. काही काळापूर्वीच त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले असून, त्या गुजरातच्या शिक्षणमंत्री आहेत. रिवाबा यांच्या या विधानामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आणि त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंवर मोठे आरोप केले आहेत. या आरोपांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा संघातील इतर खेळाडूंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या विधानामुळे आगामी काळात यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.