‘निष्काळजी आणि बेफिकीर’ यातील फरक समजल्याने घडली ऋषभची कारकीर्द

Rishabh Pant: ‘एकट्याच्या बळावर सामना फिरविणारा धोकादायक खेळाडू,’ अशी ऋषभची ओळख बनली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सकारात्मक पद्धतीने खेळून त्याने टीकाकारांनादेखील प्रशंसक बनविले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:49 AM2021-05-26T08:49:12+5:302021-05-26T08:50:29+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh's career came about by understanding the difference between 'careless and careless' | ‘निष्काळजी आणि बेफिकीर’ यातील फरक समजल्याने घडली ऋषभची कारकीर्द

‘निष्काळजी आणि बेफिकीर’ यातील फरक समजल्याने घडली ऋषभची कारकीर्द

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर :  डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंडला सर्वाधिक धोका कोणत्या भारतीय खेळाडूकडून असेल? या खेळाडूचे नाव आहे, यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत. ‘एकट्याच्या बळावर सामना फिरविणारा धोकादायक खेळाडू,’ अशी ऋषभची ओळख बनली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सकारात्मक पद्धतीने खेळून त्याने टीकाकारांनादेखील प्रशंसक बनविले. नुकतीच त्याने ‘मेन्स वर्ल्ड’ पत्रिकेला ‘विशेष मुलाखत’ दिली. त्यात ऋषभने क्रिकेटमधील कडू-गोड आठवणींना उजाळा दिला आहे. ऋषभमध्ये हा बदल एका रात्रीतून झालेला नाही. त्यामागे मोठा संघर्ष आणि त्याने घेतलेली कठोर मेहनत आहे. तो म्हणतो, ‘नकारात्मक भूतकाळ विसरुन वर्तमानाचा विचार करणारा ऋषभ देशाला सामने जिंकून देण्यात योगदान देऊ शकलो, याचे समाधान आहे.’

वयाच्या १४ व्या वर्षी ऋषभचे उत्तराखंडमधून दिल्लीला येणे, भाड्याच्या खोलीत राहून क्रिकेटमधील टप्पे सर करणे, ही प्रगती तारक सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली घडली. ऋषभचे वडील राजेंद्र यांनी घरी शाळा काढली. या शाळेची देखभाल करण्यासाठी ऋषभने शिक्षणात लक्ष द्यावे, असे शेजारी वडिलांना सांगायचे. तरीही आई सरोज आणि राजेंद्र यांनी त्याला दिल्लीला पाठविले. २०१७ मध्ये वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. ऋषभची प्रगती होत राहिली.
१४, १६, १९ आणि २३ वर्षांखालील संघात चमक दाखवून ऋषभ दिल्लीच्या रणजी संघाचा भाग बनला. २०१७ ला भारतीय टी-२० संघात पदार्पण आणि आयपीएलचा करार या बाबी सुखावणाऱ्या ठरल्या. ऋषभने यानंतरही अनेक चांगल्या खेळी केल्या.विंडीज दौऱ्यातील अपयशामुळे २०१९ ला न्यूझीलंड दौऱ्यातून ऋषभला डच्चू देण्यात आला.  ‘ऋषभ संपला ! तो शरीराने भारदस्त असल्याने संघात फिट बसत नाही,’ अशी टीका झाली. याविषयी ऋषभ म्हणाला, ‘माझ्यासाठी तो अतिशय कठीण काळ होता. अन्य युवा खेळाडूंप्रमाणे मीदेखील निराश होतो; पण खचलो नाही. काही प्रेरणा नसताना स्वत:ला धीर देत राहिलो.’

२०२० चे आयपीएल ऋषभसाठी संमिश्र ठरले. अशावेळी फलंदाजी कोच विक्रम राठोड यांनी ‘निष्काळजी’ आणि ‘बेफिकिरी’ यातील फरक समजावून सांगितला. मुख्य कोच रवी शास्त्री यांनीही ऋषभचा उत्साह वाढविला. २०२१ चे स्थगित आयपीएल २३ वर्षांच्या ऋषभसाठी संस्मरणीय ठरले. श्रेयस अय्यर जखमी झाल्यामुळे ऋषभला दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. याविषयी तो म्हणतो, ‘सिनियर्सचा सन्मान करीत मला नेतृत्वाची जबाबदारी सांभाळायची होती. उपलब्ध खेळाडूंमधून अंतिम ११ जणांची निवड हे कर्णधारापुढील सर्वांत मोठे आव्हान असते.’ 

ऋषभने आतापर्यंतच्या वाटचालीत धोनीचे योगदान सर्वांत मोठे असल्याचे सांगितले. तो म्हणाला,  ‘नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर फोकस करण्याचा मोलाचा सल्ला,’ माही भाईने दिला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध याचा सकारात्मक परिणाम माझ्या खेळात जाणवला.’ ऋषभने स्वत:च्या फिटनेसवरदेखील भर दिला. उत्कृष्ट फिटनेससाठी त्याने स्वत:चे दहा किलो वजन घटविले.

Web Title: Rishabh's career came about by understanding the difference between 'careless and careless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.