Rishabh Pant Captain, Virat Kohli Updates : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदाचा मुद्दा चर्चेत आहे. रोहित शर्मानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल याची चर्चा रंगली आहे. या जबाबदारीसाठी स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचे नावही अनेक जाणकार सुचवताना दिसतात. हे घडेल की नाही ते येत्या काही महिन्यांतच कळेलच. पण त्याआधीच पंतकडे एका वेगळ्या संघाचे कर्णधारपद आले आहे. ही 'टीम इंडिया' नसून दिल्ली रणजी क्रिकेट टीम आहे. रणजी ट्रॉफीच्या ( Ranji Trophy 2025) पुढील सामन्यासाठी पंतला दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. या सामन्यासाठी दिल्लीचा संघ शुक्रवारी १७ जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.
शुक्रवारी होणार घोषणा
रणजी ट्रॉफीची ग्रुप स्टेज २३ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. त्यात टीम इंडियाचे काही बडे खेळाडूही खेळणार आहेत. दिल्लीच्या पंतने संघाच्या संचालकांना त्याच्या उपलब्धतेबद्दल आधीच कळवले होते. अशा स्थितीत आता तो संघाचे नेतृत्व करेल असे मानले जात आहे. दिल्लीला आपला पुढचा सामना सौराष्ट्रविरुद्ध खेळायचा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) ची निवड समिती या सामन्यासाठी संघाची घोषणा करेल. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात पंतच्या कर्णधार असण्याच्या नावाला या बैठकीतच मंजुरी देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. ३८ खेळाडूंच्या संभाव्य संघातून या सामन्यासाठी संघ निवडला जाईल. सध्या हा संघ पुढील सामन्यासाठीच निवडला जात आहे. यानंतरही दिल्लीला ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा सामना खेळायचा आहे, पण त्यात पंत खेळण्याची शक्यता कमी आहे.
कोहली रणजी खेळणार की नाही?
विराट कोहलीबाबत आतापर्यंत डीडीसीएला कोणतेही अपडेट मिळालेले नाही. पंत उपलब्ध झाल्यापासून कोहली या सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध करून देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहली सध्या मुंबईत आहे. तो अलिबागमधील त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या तयारीत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत कोहली या कार्यक्रमानंतर काही अपडेट देईल अशी अपेक्षा आहे. कारण नुकतंच रोहित शर्मानेही मुंबईच्या रणजी संघासोबत सराव केला होता, ज्यामुळे तोही पुढील सामन्यात सहभागी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.