इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. उप कर्णधार आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतवर दुखापतीमुळे मैदान सोडण्याची वेळ आली. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची वेळ आल्यावर भारतीय संघाने ४४ धावांवर यजमान इंग्लंडच्या संघाला दोन धक्के दिले. नितीश कुमार रेड्डीनं एकाच षटकात दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडला धक्का बसण्याऐवजी बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियाला धक्का
सलामीवीर तंबूत परतल्यावर इंग्लंडच्या संघाकडून जो रुट अन् ओली पोप ही जोडी जमली आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह ही जोडी फोडून टीम इंडियाला दिलासा देईल, अशी अपेक्षा असताना बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडला धक्का बसण्याऐवजी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. कारण बुमराहच्या बोटाला चेंडू लागल्यामुळे रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला. दुखापतीनंतर त्याने मैदान सोडले असून बदली खेळाडूच्या रुपात त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षकाच्या रुपात मैदानात उतरला आहे.
क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान! इथं पाहा खास फोटो
चेंडू लागल्यावर स्प्रे मारुन एक ओव्हर मैदानात थांबला अन् ....
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३४ व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर बुमराहने स्ट्राइकवर असलेल्या ओली पोपला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू टाकला. हा चेंडू डाइव्ह मारून अडवताना पंतच्या बोटाला दुखापत झाली. चेंडू लागल्यावर फिजिओ मैदानात आले. स्प्रे मारून पंतने या षटकात विकेटमागे उभा राहिला. पण ३४ वे षटक संपल्यावर पंतच्या जागी ध्रुव जुरेल मैदानात आल्याचे पाहायला मिळाले.
पंतची दुखापत किती गंभीर हे अजून गुलदस्त्यातच
रिषभ पंत विकेटमागील जबाबदारीशिवाय फलंदाजीतही संघासाठी उपयुक्त खेळाडू आहे. त्यामुळेच त्याची ही दुखापत टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी आहे. ही दुखापत अधिक गंभीर नसावी, अशीच अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असेल. दिवसाअखेर त्याच्या दुखापतीसंदर्भात अधिकृत माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.