ऋषभ पंत (संकलन : महेश घोराळे)
रुडकी (जि. हरिद्वार, उत्तराखंड) या साधारण गावात जन्मलो. लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड. शाळेतून घरी येताच लगेच मैदान गाठायचो. क्रिकेटर बनेल असे काही ठरवले नव्हते. पण माझ्या वडिलांना माझ्यातील चमक दिसली. एक दिवस आम्हाला टॅलेंट हंटबद्दल कळलं. मी बारा वर्षांचा होतो. मला दिल्लीला पाठविण्याचे ठरले. ठरल्यानुसार आईसह मी दिल्ली गाठली.
पण तेथे कुठे थांबायचे? काय खायचे? याचा पत्ता नव्हता. सुरुवातीला आम्ही दर शनिवारी रुडकीहून दिल्लीला यायचो. तेव्हा स्वप्न मोठी आणि पैसे कमी होते. सारखी ये-जा परवडत नसल्याने आम्ही मोती बाग गुरुद्वाऱ्यात राहायला लागलो. तेथेच जेवण करायचो. आई गुरुद्वाऱ्यात लोकांची सेवा करायची. मी माझा सराव करायचो.
आम्ही काही महिने तेथे राहिलो. त्यानंतर अनेक रात्री मी व्हिडिओ गेम पार्लरमध्ये झोपलोय, कारण राहायला कुठे ठिकाण नव्हतं. हा काळ माझ्यासह आईसाठीही कठीण होता. अनोळखी शहरात आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही झुंजत होतो.
प्रशिक्षक तारक सिन्हा सरांनी माझी मेहनत ओळखली. मला अकॅडमीत खोली दिली. संघर्ष संपला नव्हता. दिल्ली संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा खूप होती. सरांनी सांगितलं, राजस्थानला जा. मी तेथे गेलो, शतकं ठोकली, पण बाहेरून आलेला खेळाडू म्हणून मला त्या राज्य संघात स्थान दिले नाही. पुन्हा दिल्लीला आलो. मग अंडर-१९ मध्ये निवड झाली आणि नेपाळविरुद्ध १८ चेंडूंमध्ये अर्धशतक मारून मी साऱ्यांचं लक्ष वेधलं.
अपघाताने शिकविले आयुष्याकडे कसे पाहावे
डिसेंबर २०२२ मधील माझा तो भीषण कार अपघात. ज्यातून बाहेर यायला खूप कष्ट लागले. या घटनेनंतर माझ्या विचारांमध्ये एक नवा दृष्टिकोन आला आहे. आता मी माझं जीवन वेगळ्या नजरेने पाहायला लागलो आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे आनंद घेण्याला मी महत्त्व देऊ लागलो. अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपण दैनंदिन आयुष्यात दुर्लक्षित करतो, जसं की सकाळी सूर्यप्रकाशात बसणं, दात घासणं किंवा फक्त श्वास घेणं. ही साधी वाटणारी पण आयुष्याला समृद्ध करणारी सुखं, मला माझ्या अपघातानंतर खऱ्या अर्थाने जाणवला लागली.