इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभच्या पंतच्या उजव्या पायाच्या बोटात मोठी दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
भारत आणि इंग्लंड याच्यात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जात असलेल्या चौथा कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतला दुखापत झाली. चेंडू पंतच्या उजव्या पायाच्या बोटाजवळ लागला. फिजिओ मैदानावर आले तेव्हा त्यांना पंतच्या पायातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यानंतर ऋषभ पंतला मैदानाबाहेर नेण्यात आले.
क्रिकबझने वृत्त दिले आहे की, ऋषभ पंतच्या पायाच्या बोटात फ्रॅक्चर आहे आणि त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला दोन महिन्यांचा कालवधी लागतील, असे सांगण्यात आले. परंतु, वेदना असूनही पंत फलंदाजी करण्यास उत्सुक आहे, अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
दरम्यान, वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंग हे दोघेही दुखापतीमुळे चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. तर, नितीश रेड्डी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. चौथ्या कसोटी सामन्यात अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, लॉर्ड्सवरील शेवटच्या कसोटीत पंतलाही बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो विकेटकीपिंग करण्यासाठी मैदानात आला नव्हता. परंतु त्याने फलंदाजी केली होती.