पुणे : ऋषभ पंत हा फलंदाजीत उत्कृष्ट प्रतिभेचा धनी ठरतो. तो नैसर्गिक फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. यष्टिरक्षक म्हणून मात्र त्याला अद्याप बरेच काही शिकण्याची गरज असल्याचे मत माजी दिग्गज यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांनी मंगळवारी व्यक्त केले. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवून दिल्याबद्दल पंतचे कौतुक होत असले तरी यष्टिरक्षणातील उणिवांमुळे मात्र तो टीकेचा धनी ठरताना दिसतो.
७१ वर्षांचे किरमानी म्हणाले, ‘पंतने यष्टिरक्षणात काही महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करायला हव्या. यष्टिरक्षकाची खरी ओळख तो यष्टीच्या अगदी जवळ उभा असेल त्यावेळी होते. पंतकडे पुरेसा वेळ असल्यामुळे तो जगातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजापुढेदेखील यष्टिरक्षण करू शकेल. स्विंग आणि उसळीचा अंदाज घेण्याची यष्टिरक्षकामध्ये क्षमता हवी.’ किरमानी यांनी परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याचा पंतला सल्ला दिला.