नवी दिल्ली - डावखुरा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याने आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली आणि हैदराबाद यांच्याता झालेल्या लढतीमध्ये दमदार शतकी खेळी केली. 63 चेंडूत 15 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने या खेळीदरम्यान, त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे नोंदवले. हैदराबादविरुद्धच्या शतकी खेळीबरोबर रिषभ आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. तसेच त्याने केलेली खेळी ही कुठल्याही भारतीय फलंदाजाने आयपीएलमध्ये केलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे. मात्र याचदरम्यान एक नकोसा विक्रमही रिषभ पंत याच्या नावे नोंदवला गेला आहे.
रिषभ पंतच्या 128 धावांच्या झंझावाती खेळीनंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्सला या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे रिषभने केलेली 128 धावांची खेळी ही आयपीएलमध्ये पराभूत संघातील खेळाडूने नोंदवलेली सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. त्यामुळे पराभूत संघाकडून सर्वात मोठी खेळी करण्याचा नकोसा विक्रम रिषभच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंड्सच्या नावे नोंदवलेला होता. सायमंडसने 2008 साली झालेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 117 धावांची खेळी केली होती. ही खेळी आयपीएलमध्ये पराभूत संघाकडून एखाद्या फलंदाजाने नोंदवलेली सर्वाधिक धावसंख्या होती. मात्र रिषभच्या खेळीमुळे हा विक्रम मोडीत निघाला आहे.
गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचे प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर युवा रिषभने सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली होती. त्याने स्पर्धेत जबरदस्त मारा केलेल्या हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरश: धुतले. रिषभने केवळ ६३ चेंडूत १५ चौकार व ७ षटकारांचा वर्षाव करताना नाबाद १२८ धावा कुटल्या. विशेष म्हणजे २० वर्षीय रिषभ स्पर्धा इतिहासात शतक झळकावणारा दुसरा युवा फलंदाज ठरला. याआधी २००९ मध्ये मनिष पांडेने वयाच्या १९व्या वर्षी शतक ठोकले होते. पृथ्वी शॉ (९), जेसन रॉय (११) आणि श्रेयस अय्यर (३) स्वस्तात परतल्यानंतर दिल्लीची एकवेळ ८व्या षटकात ३ बाद ४३ अशी अवस्था झाली होती. यावेळी दिल्लीच्या दीडशे धावा होणेही कठीण दिसत होते. मात्र रिषभने एकहाती हल्ला चढवताना सामन्याचे चित्र पालटले. हर्षल पटेलनेही १७ चेंडूत २४ धावा काढत त्याला चांगली साथ दिली.