नवी दिल्ली : आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईत सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने शनिवारी घेतला. कमी खर्च, चांगले हवामान आणि आधी स्पर्धा आयोजनाचा अनुभव या गोष्टींचा विचार करुन शारजा, अबुधाबी आणि दुबई या तीन मैदानांवर जवळपास २५ दिवसात सामने होतील, अशी माहिती बोर्डाचे सचिव जय शाह यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे विविध आठ संघातील खेळाडू बाधित होऊ लागल्याने २९ सामने झाल्यानंतर आयपीएल स्थगित करण्याचा बीसीसीआयने एप्रिलमध्ये निर्णय घेतला होता. उर्वरत ३१ सामने झाले नाहीत तर बीसीसीआयला २५०० कोटींचा फटका सहन करावा लागेल, म्हणून यूएईत आयोजनाची लगबग सुरू झाली होती. बोर्डाच्या विशेष सभेत आज यावर शिक्कामोर्तब झाले.
सामन्यांच्या तारखा अद्याप निश्चित नसल्या तरी सूत्रांच्या मते बोर्डाला विंडो उपलब्ध झाल्यास १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयोजन पार पडेल. अनेक सामने ‘डबल हेडर’(एका दिवशी दोन सामने) होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या पर्वात ६० सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयसने अमिरात बोर्डाला ९८.५ कोटी रुपये दिले होते.
हे खेळाडू झाले बाधित
२०२१ची आयपीएल सुरु होण्याआधी, सीएसकेचा ऋतुराज गायकवाड, आरसीबीचा देवदत्त पडिक्कल, केकेआरचा नितीश राणा आणि दल्लीचा अक्षर पटेल हे बाधित झाले. स्पर्धेदरम्यान सनरायजर्सचा रिद्धिमान साहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा,केकेआरचा संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती, सीएसकेचे गोलनदाजी कोच लक्ष्मीपती बालाजी, फलंदाजी कोच मायकेल हसी हे कोरोनाबाधित झाले. मुळे विशेषत: विदेशी खेळाडूंच्या गोटात चिंता वाढल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आले.
विदेशी खेळाडूंबाबत शंका
आयपीएलच्या ३१ सामन्यात ६२ विदेशी खेळाडूंचे आपापल्या फ्रॅन्चायजींकडून खेळणे शंकास्पद आहे. इंग्लंडने आपल्या खेळाडूंना पाठविण्यास आधीच नकार दिला. वेस्ट इंडिजचे खेळाडू कॅरेबियन लीगमुळे सहभागी होऊ शकणार नाहीत तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगला देश, द. आफ्रिका संघातील खेळाडू देखील अपापल्या राष्ट्रीय संघांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सहभागी होऊ शकणार नाहीत. बीसीसीआयने आयपीएएलचे उर्वरित सामने विदेशी खेळाडूंची अधिक चिंता न बाळगता पूर्ण केले जातील,अशी घोषणा केली.