भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि त्यांचा पहिला डाव केवळ १६२ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली. त्यांनी फक्त ४६ धावांत पाच विकेट गमावल्या आणि भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. दरम्यान, भारताचा युवा खेळाडू नितीश रेड्डीने घेतलेला एक झेल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर तेगनारायण चंद्रपॉलने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू नीट मारू शकला नाही आणि चेंडू स्क्वेअर लेगला गेला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या रेड्डीने चपळता दाखवत हवेत उडी मारून अविश्वसनीय झेल पकडला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रवींद्र जडेजाची चमकदार गोलंदाजी
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यांनी ६६ धावांतच आपले पाच गडी गमावले. यात रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली.
भारताकडून तीन फलंदाजांची शतके
वेस्ट इंडिजला स्वस्तात बाद केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी शतके झळकावत संघाला ५ बाद ४४८ धावांपर्यंत पोहोचवले. यामुळे भारताला पहिल्या डावाच्या आधारावर २८६ धावांची मोठी आघाडी मिळाली.