आशिया कप २०२५ मधील सर्वात महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित असा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना आज (१४ सप्टेंबर) रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सध्याच्या फॉर्मनुसार, टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ दिसत आहे. स्पर्धेची सुरुवातही भारताने दमदार पद्धतीने केली असून, त्यांनी यूएईला ९ विकेट्सने हरवून दणदणीत विजय मिळवला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा रेकॉर्ड पाहिल्यास, त्यात भारताचा दबदबा स्पष्ट दिसतो. भारताने पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात भारत आपल्या विजयाची मालिका कायम राखणार की पाकिस्तान पुनरागमन करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारत- पाकिस्तान यांच्यातील गेल्या ५ सामन्याचे निकाल
- २०२२ आशिया कप: दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवले.
- २०२२ टी-२० विश्वचषक: मेलबर्नमध्ये झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात विराट कोहलीने ८२ धावांची अविस्मरणीय खेळी करत भारताला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला.
- २०२४ टी-२० विश्वचषक: न्यू यॉर्कमधील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ ११३ धावाच करू शकला.
- २०२२ आशिया कप: दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला ५ विकेट्सने पराभूत केले.
- २०२१ टी-२० विश्वचषक: दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला १० विकेट्सनी हरवून एकतर्फी विजय मिळवला होता.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:भारत: शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफयान मुकीम, अबरार अहमद.