Join us

यंदा आरसीबीच जिंकणार; जेतेपद पटकावण्याचा कर्णधाराला दृढ विश्वास

एका मुलाखतीत कोहली म्हणाला, ‘या पर्वात सर्वात चांगले वातावरण माझ्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 07:02 IST

Open in App

दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. पण या पर्वाचे जेतेपद आरसीबी पटकावणार, असा दृढ विश्वास कर्णधार कोहलीने व्यक्त केला आहे. आरसीबी यावर्षी आयपीएल का व कसा जिंकणार, हेदेखील कोहलीने उलगडले. गेल्या तीन हंगामात आरसीबीला एकदाही बाद फेरी गाठता आली नव्हती. यंदा आपला संघ कमाल करेल, असे कोहलीला वाटत आहे. यंदा संघात काही बदल झाले असल्याने आपला संघ चॅम्पियन बनेल, असे विराटला वाटते.

एका मुलाखतीत कोहली म्हणाला, ‘या पर्वात सर्वात चांगले वातावरण माझ्यासाठी आहे. मला २०१६ चे पर्व आठवते. त्या पर्वासारखीच कामगिरी होईल, असे वाटत आहे. यंदाचे वर्ष आरसीबीसाठी खास असणार आहे.’ कोहली २०१६ च्या मोसमात फॉर्मात होता. त्याने तब्बल चार शतके ठोकली होती. तो पुढे म्हणाला, ‘यावर्षी संघात चांगलाच समतोल पाहायला मिळत आहे. यापूर्वी जे काही घडले ते डोक्यातून काढून टाकले आहे. यंदा फक्त जेतेपद पटकावण्याचा विचार आम्ही करत आहोत. संघात गुणवान खेळाडू आहेत. त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. त्यामुळे यंदा चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकतो, असा मला विश्वास आहे.’

ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या २२ खेळाडूंवर एक कोटी खर्च

इंग्लंडमध्ये मालिकेत व्यस्त असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या २२ खेळाडूंवर आयपीएल फ्रेन्चायजी एक कोटी रुपये खर्च करणार आहे. हे खेळाडू सात फ्रेन्चायजींचे सदस्य असल्याने सर्व मिळून त्यांच्या चार्टर्ड विमानाचा खर्च करणार आहेत. मॅन्चेस्टर ते दुबई असा प्रवास एक लाख पौंडमध्ये पडणार आहे. १६ सप्टेंबरनंतर या २२ खेळाडूंना दुबई येथे आणण्यात येईल.

आरसीबीचे अध्यक्ष संजीव चूडीवाला यांच्यासह काही फ्रेन्चायजींच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही संघांतील खेळाडू जैव सुरक्षा वातावरणात खेळत असल्याने त्यांना थेट यूएईत आणल्यानंतर विलगीकरणात न ठेवता नियमातून सूट देण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. नियमानुसार इंग्लंडमधून येथे पोहोचल्यानंतर सर्व खेळाडूंना सहा दिवस विलगीकरणात राहावेच लागेल, एसओपीनुसार पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी सर्वांची कोरोना चाचणी घेतली जाईल. ती निगेटिव्ह आल्यानंतर संघात सहभागी होता येईल.खेळाडू २४ सप्टेंबरपासून खेळण्यास उपलब्ध राहतील. तोवर सर्वच संघ किमान एक सामना खेळलेले असतील तर चेन्नई आणि मुंबईचे दोन दोन सामने झालेले असतील.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल 2020