Join us  

RCBला मोठा धक्का! ग्लेन मॅक्सवेलने घेतला अनिश्चित काळासाठी IPLमधून ब्रेक, कारणही केलं स्पष्ट

मॅक्सवेलने तडकाफडकी का घेतला एवढा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:45 AM

Open in App

Glenn Maxwell takes indefinite break from IPL 2024: RCBचा संघ सध्या प्रचंड वाईट स्थितीतून जात आहे. पहिल्या ७ सामन्यांपैकी त्यांना ६ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तशातच आता त्यांच्यासाठी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने IPLमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारणही त्यांने संघ व्यवस्थापनाला पटवून दिले आहे. IPL 2024 मॅक्सवेलसाठी फारसे खास ठरलेले नाही. तो सतत फ्लॉप झाला आहे. त्याने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 आहे. तर एकूण धावा केवळ 32 आहेत. गेल्या 6 डावात त्याचा स्कोअर 0, 3, 28, 0, 1, 0 होता.

'या' कारणासाठी घेतला ब्रेक

ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. दुसरीकडे, T20 कर्णधार मिचेल मार्शच्या फिटनेसवरही क्रिकेट ऑस्ट्रेलिया लक्ष ठेवून आहे. हैदराबाद विरुद्ध आरसीबीच्या सामन्यात मॅक्सवेल प्लेइंग-11 चा भाग नव्हता. याबाबत मॅक्सवेलने सांगितले की, त्याने स्वत: बाहेर राहण्यास सांगितले होते, कारण त्याला वाटत होते की तो सकारात्मक पद्धतीने योगदान देत नाही. म्हणून तो स्वत:हूनच संघाबाहेर होता.

मॅक्सवेलने एक प्रेस नोट जारी केली आणि म्हणाला, "पहिले काही सामने वैयक्तिकरित्या माझ्यासाठी चांगले नव्हते. त्यामुळे संघाबाहेर बसणे हा खूप सोपा निर्णय होता. मी गेल्या सामन्यात (रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस) आणि संघाच्या प्रशिक्षकाकडे गेलो आणि म्हणालो की कदाचित आता दुसऱ्याला आजमावण्याची वेळ आली आहे. मी याआधीही अशा विचित्र परिस्थितीत अडकलो होतो. तेव्हाही मी खेळत राहू शकलो असतो पण मग मला पुढे खेळणे शक्य झाले नसते. स्वतःला मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्यासाठी ही खरोखर सर्वोत्तम वेळ आहे."

मॅक्सवेलनेही संघाच्या खराब कामगिरीवरही वक्तव्य केले. "या हंगामात आम्हाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. आम्हाला हवे तसे खेळता आलेले नाही त्यामुळे निकालही विचित्र लागले आहेत. पॉवरप्ले आणि मधल्या षटकांमध्ये संघाला फटकेबाजीची मोठी कमतरता भासत आहे. गेल्या काही मोसमातील कामगिरी ही माझी ताकद आहे, पण सध्या मला तसे खेळता येत नसल्याने मी ब्रेक घेणे योग्य आहे. माझ्याजागी दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळाल्यास तो स्वतःची कारकीर्द घडवू शकेल," असेही मॅक्सवेल म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२४ग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादआॅस्ट्रेलिया