मुंबई : यंदाच्या सत्रातील पहिला विजय नोंदवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आता हीच लय कायम ठेवून सोमवारी मुंबई इंडियन्सला धक्का देण्याच्या इराद्याने वानखेडे स्टेडियमध्ये पाऊल ठेवेल.
सलग सहा पराभवानंतर कर्णधार विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आरसीबीने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. आरसीबी कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरच जास्त अवलंबून आहे. आता त्यांचे लक्ष मुंबईविरुद्धही गत सामन्याची पुनरावृत्ती करण्यावर असेल. वडील आयसीयूत दाखल असतानाही पार्थिव पटेलने ७ सामन्यांत १९१ धावा केल्या. अक्षदीप नाथ, मोईन अली, मार्कस स्टोइनिस व कॉलिन डि ग्रांडहोमे यांच्याकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत आरसीबीची सर्वात जमेची बाजू ११ बळी घेणारा युजवेंद्र चहल आहे. तो वानखेडेच्या संथ खेळपट्टीवर महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरू शकतो.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईचे लक्ष हे विजयीपथावर परतण्याचे असेल. कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डीकॉक फॉममध्ये आहेत. इशान किशन, सूर्यकुमार यादव, पोलार्ड व कृणाल पांड्या यांनीही सातत्यपूर्वक कामगिरी केली आहे.