Join us

पंतच्या संघाची दोन दिवसांत 'शरणागती'; जड्डूनं खास 'फ्रेम'सह शेअर केली मॅच विनिंग स्टोरी

जड्डूसमोर दिल्लीकरांनी टेकले गुडघे; पंत दोन्ही डावात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:04 IST

Open in App

रणजी करंडक स्पर्धेतील एलीट ग्रुप-डीमधील लढतीत सौराष्ट्र संघानं राजकोटच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात दिल्ली संघाला दुसऱ्याच दिवशीच शह दिला. पहिल्या डावात 'पंजा' मारणाऱ्या रवींद्र जडेजाने दुसऱ्या सामन्यातही आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत सात विकेट्स घेतल्या. दोन्ही डावांतील दमदार कामगिरीसह जड्डू सौराष्ट्र संघासाठी हिरो ठरला. दुसरीकडे दिल्लीच्या संघावर रिषभ पंत असताना दुसऱ्या दिवशीच पराभवाची नामुष्की ओढावली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जडेजानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा केला हा पराक्रम

रवींद्र जडेजानं आपल्या गोलंदाजीवर दिल्लीच्या संघातील फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. पहिल्या डावात दिल्लीचा अर्धा संघ जड्डूच्या जाळ्यात फसला. परिणामी त्यांचा पहिला डाव फक्त १८८ धावांत आटोपला होता. सौराष्ट्र संघानं पहिल्या डावात २७१ धावा करत सामन्यात मजबूत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात जडेजा पुन्हा दिल्लीकरांसाठी डोकेदुखी ठरला. दुसऱ्या डावात १२.२ षटकात जडेजाने ३८ धावांत ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. अन् दिल्लीचा दुसरा डाव फक्त ९४ धावांत आटोपला. जडेजानं या सामन्यात एकूण १२ विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा त्याने १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

जड्डूनं खास 'फ्रेम'सह शेअर केली १२ विकेट्सची गोष्ट

Ravindra Jadeja

सौराष्ट्र संघाकडून सर्वोत्तम गोलंदाजीचा नजराणा पेश केल्यावर अष्टपैलू खेळाडूनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेली खास फ्रेम चर्चेत आली आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ३५ अन् ३६ व्या वेळी फाइव्ह विकेट्सला गवसणी घातल्याची गोष्ट सांगत त्याने १२ रणजी सामन्यातील विकेट्सचा आनंद शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये सौराष्ट्र संघाची कॅप अन् दोन चेंडू दिसून येतात. या चेंडूंवर त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात केलेल्या कामगिरीची नोंद आहे. या स्टोरीसह त्याने रणजी सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी अन् विजयाचा आनंद साजरा केल्याचे दिसून येते. 

रिषभ पंतचा दोन्ही डावात फ्लॉप शो

सौराष्ट्र संघाविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून टीम इंडियाचा स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंतही देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. पण त्याला आपली छाप सोडण्यात अपयश आले. पहिल्या डावात अवघ्या एका धावेवर बाद झालेला पंत दुसऱ्या डावात १७ धावांवर बाद झाला. दोन्ही डावात त्याने फक्त १८ धावा केल्या. त्याची ही आकडेवारी टीम इंडियाला टेन्शन देणारी आहे. कारण तो आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग आहे.

टॅग्स :रवींद्र जडेजारिषभ पंतरणजी करंडक