मुंबई : सलग सहा पराभवांनंतर पहिल्या विजयाच्या आशेने मुंबई संघ गुरुवारी मैदानावर उतरला होता. धोनीने त्यांच्या तोंडचे पाणी पळवले. शेवटच्या चार चेंडूत १६ धावांची गरज होती आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर असलेला महेंद्रसिंग धोनी स्ट्राईकवर होता. धोनीने दमदार खेळीने चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. या विजयानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने त्याला वाकून नमस्कार केला.
अंबाती रायडूने हात जोडले. धोनीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती पाहता जुने दिवस परत आल्यासारखे वाटत होते. धोनीमध्ये धावांची भूक कायम आहे आणि या विजयामुळे आम्ही अपेक्षा कायम राखल्याचे जडेजा म्हणाला. सीएसकेने आतापर्यंत सातपैकी केवळ दोनच सामने जिंकले. आम्ही थोडे घाबरलो होतो; पण माहीत होते की धोनी क्रीजवर आहे आणि तो सामना जिंकूनच परत येईल. भारतासाठी आणि आयपीएल संघासाठी आधीही धोनीने अशी कामगिरी केली आहे. मुकेश चौधरीनेही उत्तम गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये त्याने आमच्यासाठी चांगली कामगिरी केल्याचे जडेजाने सांगितले.
शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी १७ धावा करायच्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने पहिल्याच चेंडूवर प्रिटोरियसला बाद करून मुंबईचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चेंडूवर ड्वेन ब्राव्होने एक धाव घेतली. धोनीने लाँग ऑफवर तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला.