Join us

रवींद्र जडेजा सर्वोत्तम अष्टपैलू; कसोटी क्रिकेटमध्ये राखले वर्चस्व

फलंदाजांमध्ये विराट कोहलीने दोन स्थानांची प्रगती करीत पाचवे स्थान मिळविले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 05:37 IST

Open in App

दुबई : भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत चमकदार झेप घेताना अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद दीडशतकासह सामन्यात एकूण ९ बळी घेत जडेजाने सामनावीर पुरस्कार पटकावला होता. 

आयसीसीने म्हटले की, ‘रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी केली. या जोरावर तो आयसीसी पुरुष खेळाडूंच्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे.’ जडेजाने नाबाद १७५ धावांची दमदार खेळी केली होती. या जोरावर त्याने फलंदाजी क्रमवारीत १७ स्थानांची झेप घेत ३७ वे स्थान पटकावले. त्याने गोलंदाजीत ९ बळी घेतले आणि या जोरावर तो १७ व्या स्थानी आला. फलंदाजी आणि गोलंदाजीत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर जडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत अव्वल स्थानी कब्जा केला. होल्डर फेब्रुवारी २०२१ पासून अव्वल स्थानी विराजमान होता.

फलंदाजांमध्ये विराट कोहलीने दोन स्थानांची प्रगती करीत पाचवे स्थान मिळविले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानी आहे. मोहालीमध्ये ९६ धावांची आक्रमक खेळी केलेल्या ऋषभ पंतने दहावे स्थान पटकाविले आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन कसोटी फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.गोलंदाजांमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी असून, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी कायम आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानावर आहे.

Open in App