Join us

रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी; आयसीसी क्रमवारी: दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचीही प्रगती

नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत अश्विनने सहा बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याने अव्वल स्थानी झेप घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 05:44 IST

Open in App

दुबई : भारताचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विन याने नव्या कसोटी क्रमवारीत वर्चस्व गाजवताना गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला मागे टाकत आश्विनने अव्वल स्थान काबीज केले. त्याचवेळी जुलैमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळलेला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एका स्थानाने प्रगती करत चौथे स्थान मिळवले. 

नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत अश्विनने सहा बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याने अव्वल स्थानी झेप घेतली. त्याचवेळी, वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या एका धावेने पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या अँडरसनची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. याआधी २०१५ मध्ये आश्विनने गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. यानंतर त्याने अनेकदा अव्वल स्थान भूषविले. गेल्या तीन आठवड्यांत अव्वल स्थानी येणारा आश्विन हा तिसरा गोलंदाज ठरला. याआधी, अँडरसनने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते. नव्या क्रमवारीत कमिन्स आता तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दहा बळी घेतलेला रवींद्र जडेजा आठव्या स्थानी पोहोचला असून अव्वल पाचमध्ये आश्विन आणि बुमराह हे दोन भारतीय गोलंदाज आहेत. 

फलंदाजांमध्ये ऋषभ पंत आणि कर्णधार रोहित शर्मा अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त अव्वल दहामध्ये इतर कोणीही भारतीय नाही. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी पहिले दोन स्थान कायम राखले असून इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीला एका स्थानाचा फटका बसला असून तो १७ व्या स्थानी आहे. 

अष्टपैलूंमध्ये भारताचे वर्चस्वअष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांनी अपेक्षेप्रमाणे पहिल्या दोन्ही क्रमांकावरील कब्जा कायम राखला आहे. जडेजा ४६०, तर आश्विन ३७६ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. यानंतर शाकीब अल हसन (बांगलादेश, ३२९), बेन स्टोक्स (इंग्लंड, ३०७) आणि भारताचाच अक्षर पटेल (२८३) यांचा क्रमांक आहे. यासह पहिल्या पाचपैकी तीन स्थान भारतीयांनी पटकावत आपला दबदबा राखला आहे.

टॅग्स :आर अश्विन
Open in App