भारताचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. परंतु, तो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळता दिसणार आहे, असेही त्याने स्पष्ट केले. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यावेळी त्याने आयपीएल खेळत राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु, त्याने अचानक आपल्या निर्णय बदल केल्याने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
अश्विन हा आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही भाग होता. परंतु, या काळात त्याला अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वीच अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर राहुल द्रविडची मुलाखत घेतली. त्यावेळी त्याने वारंवार संघातून वगळले जात असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, अश्विनने अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अनेक वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे त्याची आयपीएल कारकिर्द जास्त काळ टिकणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. यानंतर, आता २७ ऑगस्ट रोजी ही गोष्ट खरी ठरली.
निवृत्तीची घोषणा करताना अश्विन म्हणाला की, "आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि नवीन सुरुवातही आहे. मी माझ्या आपपीएल कारकिर्दीला पूर्णविराम लावतो. परंतु, विविध लीगमध्ये खेळत राहील. आयपीएल आणि बीसीसीआयने आतापर्यंत मला जे काही दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. आयुष्यात पुढे जे मांडलंय, त्याचा आनंद घेण्यास उत्सुक आहे."